हैदराबाद (हिं.स.) : नव्याने निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या प्रभावामुळे तसेच विविध राज्यात चित्रपटगृहांची स्थिती आणि नवीन निर्देश लक्षात घेत बाहुबली दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी अखिल भारतीय आरआरआर चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.
सामाजिक माध्यमांवर अधिकृत घोषणा करताना आरआरआरच्या वृंदाने स्पष्ट केले “सर्व भागधारकांचे हित लक्षात घेत, चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यास आम्ही विवश आहोत. बिनशर्त आणि निस्वार्थ प्रेमासाठी चाहते आणि प्रेक्षकांचे धन्यवाद. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही काही गोष्टी सर्वांच्या हाताबाहेर असतात. ज्या प्रकारे विविध राज्यातील चित्रपटगृह बंद होत आहे त्यामुळे आपली उत्कंठा काही काळा कायम ठेवा एवढंच सांगू शकतो. भारतीय चित्रपटाचे वैभव पुन्हा एका आपण सर्वांपुढे घेऊन येणारच.”
बाहुबलीच्या वैश्विक यशानंतर ‘आरआरआर’ 7 जानेवारी 2022 रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार होता. आरआरआर ची व्याप्ती लक्षात घेत तसेच सर्वांचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेत चित्रपट निर्माता संघाने काही चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेत बदल करीत आरआरआर साठी रस्ता मोकळा करून दिला मात्र पुन्हा एकदा आरआरआर चित्रपटाचे प्रदर्शन बाधित झाले आहे.
काही दिवसांपासून आआरआर च्या प्रसिद्धी आणि प्रचार कार्यक्रमांना वेग प्राप्त झाला होता .चित्रपट वृंद विविध भाषांमध्ये, विविध शहरात प्रदर्शनपूर्व कार्यक्रम तसेच माध्यमांशी मोठ्या प्रमाणात चर्चा आणि संवादाचे कार्यक्रम आयोजित करीत होते. चित्रपटाचे सर्व कलाकार आणि वृंद देखील यात जातीने भाग घेत आहेत. मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम येथे मोठ्या प्रमाणात प्रदर्शनपूर्व कार्यक्रम घेण्यात आले. मात्र आता आरआरआर चित्रपटाचे प्रदर्शन बाधित झाल्याने मोठ्या प्रमाणावर रसिक आणि चाहत्यांच्या आनंदावर विरझण पडले. आरआरआर चित्रपटातील नवीन आणि दमदार झलक सामाजिक माध्यमांवर पूर्वीच प्रदर्शित करण्यात आली असून सर्व भाषांमध्ये अग्रस्थानी आहे. आठवड्यानंतरही ही झलक आकर्षण आणि कौतुकास पात्र ठरत आहे. आरआरआर चित्रपटातील सर्व गाणी सर्व भाषांमध्ये आजही सामाजिक माध्यमांवर अग्रस्थानी आहे.
‘आरआरआर’ अल्लुरी सीताराम राजू आणि कोमरम भीम या महान क्रांतिकारकांच्या जीवनावर एक काल्पनिक चित्रपट आहे. “रौद्राम… रणम … रुधिरम” अशी चित्रपटाची संकल्पना आहे. चित्रपटात अभिनेते ज्युनियर एनटीआर कोमरम भीम तर रामचरण अल्लुरी सीताराम राजूंच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र आले असून बाहुबलीनंतर दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या आरआरआर चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी दोघांनी वेगवेगळ्या चित्रपटात दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्यासोबत काम केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तराचे तंत्रज्ञ-कलाकार अभिनेत्री ओलिव्हिया मॉरिस, अॅिलिसन डूडी आणि रे स्टीव्हनसन चित्रपटात सहभागी आहेत. चित्रपटात अभिनेते अजय देवगण, समुद्रकणी श्रिया सरण आणि आलिया भट आणि अन्य भाषांमधील आणि देशांच्या कलाकारांचा देखील समावेश आहे.