Saturday, May 3, 2025

कोलाजमहत्वाची बातमी

अशी झाली गंमत

अशी झाली गंमत

डॉ. विजया वाड

दांडेकर वहिनींच्या घरी चोर घुसला. त्याची ‘नवयुग’ सोसायटीत कानोकानी खबर पोहोचली. आपापल्या सुखवस्तू घरात, प्रत्येक गृहिणी दांडेकर वहिनींपेक्षा स्वत:ला मनोमन भाग्यवान समजत होती. कारण दांडेकर वहिनींना पाचशे पन्नास रुपयांचा गंडा घातला होता चोराने. दुसऱ्याचा पैसा नुकसानीत जावा, एवढे काही आपण दुष्ट नसतो. दांडेकर वहिनींना पाचशे पन्नास गेले तेव्हा शेजारी म्हणाले, “अहो वैनी... पिझ्झा खाल्ला असे समजा; पाचशे पन्नासचा!” “तसंच समजायचं आता!” दांडेकर वैनी दु:ख झाकीत म्हणाल्या. खरं तर आपण गंडवले गेलो, याचं दु:ख उकळीवर उकळी फुटून कढकढत होतं. पण काय करणार? सदाबहार व्यक्तिमत्त्वेसुद्धा अशा रितीने गंडविली जातातच की! त्याचं असं झालं... बंडू सख्खा मावसभाऊ घरी अचानक चेहरा पाडून आला. “तायडे, टॅक्सीवाल्याचे पाचशे पन्नास बिल झालंय. त्याच्याजवळ दोन हजारचे सुट्टे नाहीत. तू देतीस का?” “अरे हो बंडू.” तायडीने पाचशे पन्नास पाकिटातून काढले आणि बंडूच्या हाती सोपवले. कुंदा मावशीची चौकशी तायडीला खूप समाधान घेऊन गेली. तिची लाडकी मावशी. कुंदा मावशी तिला मधल्या सुट्टीत खाऊ खायला द्यायची. बंडू तिचा भाऊ, शाळूसोबती, दोस्त... सर्वकाही. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या बंडू जायला निघाला. “तायडे, पाचशे पन्नास अंगावर आहेत बरं! लक्षात ठेवीन मी.” “अरे काय यवढं? बंडू!” “आपण कुणाचं उसनं ठेवीत नाही.” “बंडू! रागवीन हं मी.” “घरी गेलो की, कमळ्याबरोबर काढून पाठवतो.” “अरे हो हो. पावले मला.” “कमळाकर देऊन जाईल.” मुलाची शाश्वती देत बंडू परतला. न कमळ्या आला, न बंडू! न बंडूची बायको! “पाचशे पन्नाससाठी जीव काढू नकोस.” नवऱ्याने सुनावले. “मी कशाला काढू माझा जीव?” ताई गाल फुगवून म्हणाली. पण आतल्या आत तिचा जीव अर्धा-मुर्धा झाला होता. बंडूने नाहक आपल्याला फसवले ही धाकधूक जीवास होती. म्हणून मग पाच-सहा दिवस गेल्यावर ती बंडूच्या घरी पोहोचली. “तायडे, कुंदा मावशीची आठवण आली वाटतं.” “अगं, मावशी, तुझी तर आठवण नेहमीच येते.” “बंडू आला होता ना तुमच्यात?” “हो. टॅक्सी करून आला होता. नेमके दोन हजार होते गं मावशी.” “हो हो. सांगत होता बंडू.” “काय?” “तू टॅक्सीचं बील भरल्याचं!” … मावशी कौतुकली. “अगं काय यवढं?” तायडीला पाचशे पन्नास मागायचा धीर होईना. “अगं माणसं चामडीपेक्षा पै पैशाला मख्खीचूस होऊन जपतात. त्यात तुझे मोठेपण उठूनच दिसते हो तायडे.” झाले का अवघड आता पैसे मागणे! ती तशीच ‘रिकामी’ परतली. पैसे न घेता. नवरा आला. बायकोचे उतरलेले तोंड बघून म्हणाला, “नाहीच ना मिळाले पाचशे पन्नास? फेरी फुकट गेली ना?” “मी का पाचशे पन्नासांसाठी मावशीकडे गेले असं वाटतं का तुम्हाला?” “सुप्त अंतस्थ हेतू तर तोच होता ना?” “उगाच वाट्टेल ते बोलू नका.” तायडी रागाला आली, तसा नवरा गप्प झाला एकदम! कधी गप्प बसावे, असे शहाण्या-सुरत्या नवऱ्यांना बरोब्बर समजते. खरे ना? पण शालू मावशी घरी आली आणि सगळा फुगा फुटला. “बंडू आला होता का गं तुझ्यात?” “हो. चार-पाच दिवस झाले.” “पाचशे पन्नास रुपये टॅक्सीला मागितले?” “हो गं मावशी. पाचशे पन्नास मागितलेनी बरोब्बर. तुला कसं कळलं?” “भस्म्या रोग जडलाय बंडूला.” शालू मावशी म्हणाली. “अगं काय सांगतेस मावशी?” “तायडे, टॅक्सीचं बील देतो असं सांगून पैसे घेतो. येतो मात्र शेअर रिक्षा करून.” “काय सांगतेस?” “पंचवीस रुपये पण खर्चत नाही. बाकी सारे पॉकेटमनी म्हणून वापरतो बरं बंडू. फुकटचंद झालाय नुस्ता. साठ नातेवाइक आहेत आपले. महिन्याला पाच दिले, वर्ष निभते.” शालू मावशीचे बोलणे ऐकून भाचीबाईंनी आ पसरला तो पाच मिनिटे तसाच होता!
Comments
Add Comment