नवी मुंबई (प्रतिनिधी) :घणसोलीमध्ये भूमिगत विद्युतवाहिन्या जळण्यात वाढ होत असल्याने नवीन विद्युतवाहिन्या टाकण्याची मागणी होत आहे. मनपा विद्युत विभागाने मागील सात वर्षांपूर्वी घणसोली गाव परिसरात ग्राहकांची संख्या पाहून त्या नियोजनाने भूमिगत वाहिन्या टाकल्या; परंतु काही वर्षे उलटल्यावर आजच्या घडीला ग्राहक संख्या पाच पटीने वाढल्याने भूमिगत विद्युतवाहिन्यांवर अतिरिक्त दाब येतो. त्यामुळे विद्युतवाहिन्या जळण्याच्या घटना नियमित होत आहेत.
नियमित होणारी नागरी कामे व अवैध बांधकामे चालू असल्याने यामुळेसुद्धा विद्युत वाहिन्यांना धोका पोहोचत आहे. त्याचा परिणाम केबलवर होतो. त्यामुळे वीज खंडित होऊन नागरिकांना त्रासाचा सामना नेहमीच करावा लागत आहे. यावर उत्तम उपाय म्हणून नवीन केबल वाहिन्या टाकाव्यात, या मागणीचा जोर धरू लागला आहे.
सात वर्षांपूर्वी विद्युतवाहिन्या टाकताना ग्राहक संख्येचा विचार करून येथील विद्युतवाहिन्या भूमिगत केल्या होत्या. पण घणसोली गाव परिसरामध्ये नागरिकरण मोठ्या प्रमाणात झाले असल्याने घराघरात विद्युतपुरवठा होताना आता जुन्या वाहिन्यांना भार झेपेनासे झाले आहे. त्यामुळे नियमित विजेचा खेळखंडोबा घणसोलीमध्ये पाहावयास मिळत असल्याचे खासगी वायरमन रवींद्र राजीवडे यांनी सांगितले.
दरम्यान घणसोली येथील परिसरामध्ये नियमित नागरी कामे चालू असतात. त्यावेळी देखील खोदकाम करताना विद्युत वाहिन्या तुटतात. तसेच वाहिन्या तुटल्याने त्यांचे सांधे जोडले जातात. त्यामुळे पावसाळ्याच्या हंगामात त्या सांध्यात पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊन भूमिगत वाहिन्या जळण्याचे प्रकार घडतात. दरम्यान वीज खंडित होत असल्याने याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे, रहिवाशी अजय पवार
यांनी सांगितले.