भटक्या कुत्र्यांची जबाबदारी आता प्राणीमित्र संस्थांकडे!
January 1, 2022 05:49 PM 94
मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर शहरातील भटक्या कुत्र्यांना कोंडवाड्यात ठेवावे आणि नंतर ते प्राणीमित्र संस्थांना दत्तक म्हणून द्यावे, अशी ठरावाची सूचना मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे. या ठरावाला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली व त्यावर पालिका आयुक्त यांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यास त्याची लवकरच अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.
भटक्या जनावरांप्रमाणेच भटक्या कुत्र्यांचाही मुंबईकरांना पहाटे व रात्रीच्या सुमारास खूप त्रास होत असतो. त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांना व त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सामाजिक संस्थांमार्फत मुंबई महापालिका त्यांचे निर्बीजीकरण करते. मात्र अद्यापही भटक्या कुत्र्यांची समस्या सुटलेली नाही. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी भटकी गुरे, जनावरे यांच्यासाठी असलेल्या कोंडवाड्यांप्रमाणे भटक्या कुत्र्यांसाठीही आवश्यक त्या ठिकाणी कोंडवाडे उभारण्यात यावेत. ज्या प्रमाणे वाघांना दत्तक दिले जाते त्याप्रमाणेच या कोंडवाड्यात ठेवण्यात येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना प्राणीमित्र संस्थांना दत्तक म्हणून जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
मुंबईत भटक्या जनावरांमुळे रस्त्यावर वाहतुकीला व पादचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. त्यामुळे पालिकेने अशा मोकाट व भटक्या गुरांना, जनावरांना पकडून त्यांचा सांभाळ व देखभाल करण्यासाठी कोंडवाड्याची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये त्या जनावरांचे मालक येऊन दंडाची रक्कम भरून त्यांना सोडवून नेईपर्यंत कोंडवाड्यात ठेवण्यात येते.
Comments
संबंधित बातम्या
आणखी वाचा >