ठाणे: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या शिधावाटप कार्यालयात मोडकळीस आलेले बांधकाम आणि सुविधांचा अभाव यामुळे कर्मचारी आणि नागरिक मरण यातना भोगत आहेत. आमदार संजय केळकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करत दुरुस्ती आणि सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
गेली अनेक वर्षे ठाणे शहराचे चाळवजा शिधावाटप कार्यालय मोडकळीस आलेले असून पाणी स्वच्छतागृह, शौचालय अशा विविध समस्यांनी कर्मचारी त्रस्त आहेत तर हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता, मात्र कासवगतीने सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे समस्यांमध्ये आणखीनच भर पडल्याचे निदर्शनास आले. श्री. केळकर यांनी आज शिधावाटप अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. धोकादायक छप्पर, भिंतींची अर्धवट दुरुस्ती, पंखे, पिण्याचे पाणी, शौचालय अशा अनेक समस्या यावेळी निदर्शनास आल्या. श्री. केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त करत कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले.
एकत्रित पुनर्विकासाची गरज
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिधावाटप, पाणीपुरवठा, कौशल्य विकास आदी कार्यालये असून जीर्ण अवस्थेत आहेत. हजारो सर्वसामान्य नागरिकांचा येथे रोज राबता असल्याने एखादी दुर्घटना घडली तर जीवितहानीची शक्यता आहे. ही कार्यालये एकाच सुसज्ज इमारतीत असावीत अशी मागणी आमदार संजय केळकर अनेक वर्षांपासून करत आहेत. एकत्रित पुनर्विकासासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे, मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने हजारो ठाणेकरांचा या कार्यालयांमधील वावर धोकादायक झाला आहे.