पुणे : संपूर्ण पुणे जिल्हा ग्रामीण भागात ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करणारे व्यवसायिक, खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट, संस्था यांना त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करावयाचा असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलिस स्टेशन ला ७ दिवसांपूर्वी कळवून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांची रीतसर परवानगी घेणे बाबत बंधन घालण्यात आले आहे.यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे.
संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे,धरणे, केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचना तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहाळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याबाबत कळविण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त पुणे ग्रामीण जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या धार्मिक सोहळे, लग्नसमारंभ,राजकीय सभा किंवा इतर कार्यक्रम मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा समावेश असतो.
या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता ड्रोन कॅमेराचा छायाचित्रणाकरीता वापर करणाऱ्या संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची वेळीच पडताळणी करून त्याबाबतची सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल.