Saturday, July 5, 2025

अस्वल दात तस्करीप्रकरणी दोघांना अटक

अस्वल दात तस्करीप्रकरणी दोघांना अटक

सोनू शिंदे


उल्हासनगर : स्वतःच्या फायद्यासाठी पोलिसांचा दुरूपयोग करण्यासाठी गेला आणि स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना उल्हासनगरात समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी अन्वर खान आणि आरिफ सिरिजउद्दिन याला बेड्या ठोकल्या आहेत.

मागील आठवड्यात उल्हासनगर कॅम्प नंबर ४च्या व्हिनस चौक परिसरात धीरज मोबाइल दुकानात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकत या ठिकाणावरून अस्वलाचे तब्बल ६४५ दात किंवा नखे जप्त केले होते. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात व्यापारी संजय नागपाल याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या घटनेचा अधिक तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे हे करत होते. संजय नागपाल याची सखोल चौकशी केल्याने तपासाला वेगळीच दिशा मिळाली आहे.

संजय नागपाल यांच्या दुकानातील सीसीटीव्ही आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांना बातमी देणाराच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अन्वर खान याने मुंब्रा येथील राहणारा आरोपी आरिफ सिरिजउद्दिन याला नागपाल यांच्या दुकानात अस्वलाचे दात खिडकीच्या मागून टाकण्यास सांगितले आणि हा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आरोपी आरिफ याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

मुख्य आरोपी अन्वर खान यालाही अटक करण्यात आली असून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी अन्वर आणि आरिफ याने हे अस्वलाचे दात कोणाकडून आणले, आतापर्यंत किती अस्वलांची हत्या केल्या आहेत, याचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे हे करत आहेत.
Comments
Add Comment