पालघर : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांचीसंख्या सतत वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या १ डिसेंबरपासून काही शाळा व महाविद्यालये सुरू झाली होती. परंतु, कोविड १९ चा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे पालकवर्ग आता चिंतेत सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांत पालघर जिल्ह्याचा ग्रामीण भाग व वसई-विरार शहर मनपा क्षेत्रात सुमारे २२० रुग्ण सापडले. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी सेवा बंद असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते. त्यात आता प्रादुभार्वाला पुन्हा वेग आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे शहरी भागात पुन्हा ऑनलाइन शिक्षण प्रणाली पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात मात्र ही व्यवस्था स्वीकारणे व्यवहार्य ठरू शकणार नाही. कारण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाइलची रेंज नसणे, इंटरनेटची सुविधा नसणे व अधूनमधून विजेचा लपंडाव अशा कारणांमुळे ही व्यवस्था कुचकामी ठरते. गेल्या वर्षी सरकारने प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. तसेच, ग्रामीण भागातील मुलांनादेखील अशा पद्धतीने शिक्षण घेण्यात फारसे स्वारस्य नसते. त्यामुळे या सर्व शाळा बंद होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.