Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

ऑनलाईन शिक्षणाला काही शाळांकडून आदेशाला हरताळ

ऑनलाईन शिक्षणाला काही शाळांकडून आदेशाला हरताळ

नाशिक: राज्य शासनाच्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार १३ डिसेंबरपासून नाशिक शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. सर्व प्रकारच्या, व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू ठेवून कोणताही विद्यार्थी शिक्षण घेण्यावाचून वंचित राहू नये, असे स्पष्ट आदेश असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शाळा व्यवस्थापनाकडून नकार दिला जात असल्याचा तक्रारी आहेत.



कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिक शहरातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा दिनांक १३ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप शहरातून कोरोना हद्दपार झालेला नाही. त्यातच नव्याने आलेला ओमायक्रॉन या कोविड व्हेरिएन्टमुळे भीती कायम आहे. असे असले तरी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील शाळा योग्य ती दक्षता व नियमांची अंमलबजावणी करून सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.


त्यानुसार शहरातील सर्व प्रकारच्या शाळा त्या त्या संबंधित शाळा व्यवस्थापनाने त्यांच्या पातळीवर काळजी, दक्षता घेऊन सुरू ठेवल्या आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ आणि महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ नुसार संबंधित शाळा व्यवस्थापनांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अभ्यासक्रम घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे. किंबहुना तसा नियमही आहे.


सद्यस्थितीत शहरातील बहुसंख्य शाळा ऑफलाइनच सुरू आहेत. दक्षता म्हणून सर्व शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आम्ही आमच्या जबाबदारीवर आमच्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना शाळेत पाठवत आहोत, असे हमीपत्र लिहून घेतले आहे. पालकांनीही तसे हमीपत्र स्वेच्छेने लिहून दिले आहे; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि भीतीमुळे काही पालक आणि विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत न जाता ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणे पसंत करीत आहेत. त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना ते ज्या शाळेमध्ये शिकत असतील त्या शाळांनी ऑनलाइन शिक्षण देणे बंधनकारक आहे; परंतु काही शाळा मात्र अशाप्रकारे ऑनलाईन शिक्षण देण्यास नकार देत असल्याच्या पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.



याबाबत शिक्षणाधिकारी धनगर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना संबंधित शाळांनी ऑनलाइन शिक्षण देणे आवश्यक आहे. त्याबाबतच्या पालकांनी महापालिकेकडे तक्रार केल्यास संबंधित शाळांना समज देण्यात येईल. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment