
डी कॉकने जवळपास सात वर्षे कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. मात्र, सध्या त्याची फलंदाजी अपेक्षित होत नव्हती. सेंच्युरियन कसोटीत पहिल्या डावात ३४ आणि दुसऱ्या डावात २१ धावा त्याला करता आल्या. २९ वर्षीय डी कॉक दक्षिण आफ्रिकेकडून ५४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३३०० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ३८.८३ राहिली आहे. डी कॉकने कसोटी सामन्यांमध्ये सहा शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत.
फाफ डु प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्विंटन डी कॉककडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. २०२१ वर्षाच्या सुरुवातीला तो संघनायक झाला. मात्र, नेतृत्वासह फलंदाजी, यष्टिरक्षण अशी दुहेरी सांभाळताना डी कॉकची दमछाक झाली आणि त्याने कर्णधारपद सोडले. त्यानंतर डीन एल्गरकडे जबाबदारी सोपवण्यात आली. डी कॉकने चार कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. यात संघाने दोन सामने जिंकले, तर तितक्याच सामन्यांमध्ये पराभवाचा झाला.