ठाणे : खारीगाव रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाला मंजुरी मिळवून देण्यासाठी शरद पवार यांनी तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांच्यासह तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. या पुलाच्या उभारणीसाठी आर. ए. राजीव, असीम गुप्ता आणि संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून निधी मिळवून घेतला आहे. त्यामुळे या पुलासह कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलासाठी आमची प्रचंड मेहनत आहे. आम्ही फक्त विकासाशिवाय आम्ही दुसरे राजकारण करीत नाही, विकासाव्यतिरिक्त आम्ही दुसरे काही बोलत नाही, हे या निमित्ताने आपण सांगत आहोत, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी खारीगाव येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाची पाहणी केली. या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान या पुलाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही ठाणे पालिकेला पत्रही दिल्याचे डॉ. आव्हाडा यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या पुलाची मंजुरी ही आर. ए. राजीव हे आयुक्त असताना मिळाली होती. असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात या पुलाच्या उभारणीला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. त्यानंतर रेल्वेच्या जागेतील पुलाचा खर्च रेल्वेने करायचा होता. तेव्हा खासदार आनंद परांजपे हे होते. तर, रेल्वे मंत्रीपदी मल्लिकार्जुन खरगे हे विराजमान होते. शरद पवार हे आनंद परांजपे यांच्यासह खरगे यांना भेटले अन् रेल्वेकडून मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर हा पूल ज्या जागेत उतरत आहे; ती जागा मफतलालची असल्याने मफतलाल कंपनीकडून आक्षेप नोंदविण्यात आला.
मफतलाल कंपनीने ज्या जागेत पूल उतरविण्यात येणार होता; त्या जागेचे ३९ कोटी रुपये कोर्टात भरावे लागतील, असे सांगितले. त्यावर ठामपाचे तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे पैसे तत्काळ भरुन अंतिम मान्यता घेतली. आता हा पुल जवळ-जवळ पूर्णत्वास आला आहे. त्याचे कधीही उद्घाटन होईल. या उद्घाटनाबद्दल आम्हाला कोणताही वाद घालायचा नाही. पण, एवढेच सांगायचे आहे की या पुलासह कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलामागे आमची प्रचंड मेहनत आहे.