Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

नियत, नियती आणि जय हो...! 

नियत, नियती आणि जय हो...! 

संतोष वायंगणकर :



गेले आठ दिवस कोकणात नेहमीप्रमाणे राणे विरोधी एककलमी राजकीय विरोधी गोंधळ सुरू होता. निमित्त होत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीच. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एवढं मोठं राजकारण आणि सत्ता, पोलिस प्रशासनाचा वापर हा पहिल्यांदा पहायला मिळाला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यश कोण मिळवणार ? विजयी कोण होणार ? याची कमालीची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला होती. मागील आठवडाभर तर सिंधुदुर्ग जिल्हा ढवळून निघाला. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी असलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार एका बाजूला अधिक जिल्हा बँकेची सारी यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला भाजपा आणि राणे अशी निकराची लढाई होती. निवडणुकीत विजय हा महत्वाचा मानला जातो.



आपण सारे संतांचे अवतार, समोर मात्र सारे दहशतवादी हे आभासी चित्र किती खोटे होते. यातले सत्यही काही घटनांमधून समोर आले आहे. राजकारणातील साधन सुचिता आणि सुचीर्भुतपणा आपण पाळायचा नाही. परंतु समोरून अपेक्षा ठेवायची हे सारेच अनाकलनिय आहे. राजकारण असो समाजकारण असो की क्षेत्र कोणतेही असो नियती तुमची जशी नियत असते त्याप्रमाणे यश अपयश देत असते. या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीने अशी कोणतीच चौकट पाळली गेली नाही. जेवढा म्हणून सत्तेचा माज आणि वापर करता आला तो करण्यात आला. तो उघड दिसण्यासारखाही होता.


आ. नितेश राणे, माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठीही सारा आटापिटा केला गेला. हे सिंधुदुर्गातील जनतेने पाहिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक अधिक मुख्यमंत्री कार्यालय असे नेते आणि अशी सारी यंत्रणा या निवडणुकीत उतरली होती. यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती.


एकिकडे सारी यंत्रणा वापरूनही महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख म्हणून पुढे आलेले सतिश सावंत आणि भाजपा उमेदवार विठ्ठल देसाई यांच्यात समान मते पडली. चिठ्ठीद्वारे विठ्ठल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले. नियती सतिश सावंत यांच्यासोबत नव्हती. ती का सोबत राहिली नाही याचाही शोध त्यांनी घ्यावा. पक्ष, निवडणुका, समाजकारण, राजकारण हे सगळ एका बाजूला ठेवलं तर त्यापलिकडे माणुसकी आणि माणूस असतो. शेवटी जाणीव ही असायलाच हवी. ती नसेल तर मग... कशालाच काही अर्थ उरत नाही.



जिल्हा बँकेतील या यशाने केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राणे विरोधकांनी ज्या पद्धतीने प्रचाराच्यावेळी भाषा आणि शब्द वापरले त्यांनाही यानिमित्ताने जागा दिसून आली आहे. ‘जो जिता वही सिकंदर’ हे लक्षात घेतले पाहिजे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाकडून आ. नितेश राणे, माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, खा. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी हे यश मिळविण्यासाठी परिश्रम घेतले होते. जिल्हा बँक निवडणुकीतील हे जय हो!

Comments
Add Comment