बदलापूर : देशात ओमायक्रॉनची संख्या दिवसेंदिवस वाढत असून डोंबिवली पाठोपाठ बदलापूरातही बुधवारी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याने बदलापूरकरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
बदलापूर पूर्व परिसरात रहाणारी २८ वर्षीय बाधित पोलीस कर्मचारी नायगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत असून त्यांची ड्युटी मागील आठवड्यात विधानसभा अधिवेशनात लागली होती. २५ डिसेंबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली.
खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बदलापूर येथील गौरी हॉल कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे. तसेच त्याच्या पत्नीचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह असल्याची माहिती कुळगाव -बदलापूर नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेश अंकुश यांनी दिली.