Sunday, October 26, 2025
Happy Diwali

भ्रमंती

भ्रमंती

राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!

भालचंद्र घरातून पळाला ही बातमी जेव्हा जिकडे तिकडे पसरली, तेव्हा आप्तमंडळींस आतोनात दु:ख झाले. त्याचा विद्यार्थीदशेत ज्यांच्याशी संबंध आला होता ते फारच हळहळले. जिकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. त्याच्या चुलत्याची तर तारांबळच उडाली.

इकडे भालचंद्र जो निघाला तो सोसाट्याच्या वाऱ्यासारखा अखंड कोकणात भटकला. रोज वीस-वीस मैल पायपीट करीत असे. सुमारे एक वर्ष तो सतत भ्रमंतीत होता. चालता-चालता वाटेत एखादे घर लागल्यास दारात जाऊन गप्प उभा राहत असे. दया येऊन कोणी एखादा भाकरीचा तुकडा हातावर घातलाच, तर तो खात-खात चालू पडणे, रात्र झाली की, झाडाखाली, नाहीपेक्षा एखाद्या मंदिरात झोपणे, सकाळी उठला की पदयात्रा सुरू. त्याच्या अशा या वागणुकीमुळे त्याची शरीरयष्टी पार बदलून गेली होती. केस, नखे वाढली होती. त्यामुळे सहसा त्याची ओळख कोणासही पटत नसे. तो काळ त्याच्या ऐन पंचविशीतला होता; परंतु नीतीची जडण आणि घडण जराही हालली नव्हती. अगदी साचेबंद होती. त्याची वृत्तीही शांत आणि गंभीर अशी होती. खळखळणारी उथळ नव्हती.

‘जयाशी वाटे सुखची असावे । तेणे रघुनाथ भजनी लागावे ।। सकल स्वजन त्यजावे । दु:खमूळ जे ।।’ या रामदासांच्या तत्त्वानुसार भालचंद्राची वृत्ती खंबीर बनली होती. ऊन, वारा, पाऊस यांचे त्याला कसलेही बंधन नव्हते. आतून नामस्मरण, मात्र सतत चालू असे. पण समाज त्याला डोळस वृत्तीने न पाहता एक वेडा म्हणूनच ओळखीत असे.

भालचंद्र वसईला शिकत असताना अधून-मधून त्याने ज्योतिषाचा अभ्यास केला होता. किंबहुना तो जणू हस्तरेषा पंडित होता. ज्योतिषशास्त्र हा त्याचा आवडता छंदच होता. नितवडे येथे तो आजूबाजूच्या लोकांच्या हस्तरेष पाहून त्यांना अचूक मार्गदर्शन करीत असे. पण या अलोट गर्दीचा त्याला दिवसेंदिवस फार उपद्रवच होऊ लागला. कारण काही पोटभरू ज्योतिषी उलट-सुलट आकडेमोड करून, बिदागी घेऊन वाटेल ते ठोकून देतात, त्यातला भालचंद्र ज्योतिषी नव्हता. त्याच्या ज्योतिषाला फी नव्हती आणि अर्थातच गर्दी त्याचमुळे होत असे. या अशा परोपकारी गुणामुळे तो समाजाचा कंठमणी झाला होता; परंतु या त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला आपल्या घरच्या कामावर जणू पाणीच सोडावे लागले होते. त्यामुळे त्याची फजितीच झाली होती.

वास्तविक त्याचा आत्मा एका वेगळ्याच तत्त्वातला होता. त्यामुळे तो दिवसेंदिवस लोकांच्या या स्वार्थी गर्दीपासून दूरच राहू लागला. कारण परमेश्वराने आपणास हस्तरेषा पाहण्यासाठी जन्माला घातले नसून नरदेहाचे सार्थक ज्याच्यात आहे, असा तो धर्म किंवा पंथ कोणता आणि तो कसा सापडेल या थोर विचारांच्या तरंगात तो रंगला होता. कारण तो उपजतच विवेकी होता. (क्रमश:) राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!

Comments
Add Comment