Thursday, October 10, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसावध तो सुरक्षित

सावध तो सुरक्षित

मंगला गाडगीळ, मुंबई ग्रहक पंचायत

सर्व ग्राहकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पूर्वी दुकानात गेल्याशिवाय ग्राहकांना खरेदी करताच येत नव्हती; परंतु आता एका क्लिकवर आपल्याला हवी ती वस्तू घरी मागवता येते. अंधेरी, मुंबईतील एका ज्येष्ठ महिलेने अशीच एक वस्तू ऑनलाइन मागवली होती. त्यासाठी त्यांनी १४९६ रुपये भरले होते, पण त्यांना ती वस्तू काही मिळाली नाही. शिवाय भरलेले पैसेही मिळाले नाहीत. त्यांना काय करावे कळेना. त्यांनी मग असे पैसे कसे परत मिळवता येतील, याचा गुगलवर शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना एक फोन नंबर मिळाला. त्यावर फोन केला असता त्यांनी मोबाइलवर ‘एनिडेस्क ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगितले, त्यासाठी आवश्यक परवानग्याही देण्यास सांगितले. यामुळे महिलेच्या मोबाइलचे पूर्ण नियंत्रण त्या भामट्याकडे गेले. पुढच्या आठ दिवसांत थोडे-थोडे करत तब्बल १२ लाख रुपये काढले गेले. त्याबद्दल विचारणा केली असता ती एक प्रक्रिया असून सगळी रक्कम एकत्रित परत मिळेल, असे सांगितले.

काही दिवस गेल्यावरही ही रक्कम बँकेत जमा न झाल्याने त्यांनी फोनवरून विचारणा केली असता तो फोन बंद असल्याचे व फसवणूक झाल्याचे समजले. इथे दोन गफलती झाल्या. शोध घेताना आपण फसव्या वेबसाइटवर जाऊ शकतो, हे लक्षात घेतले गेले नाही. दुसरी गफलत म्हणजे, सांगितलेले ॲप डोळे मिटून डाऊनलोड केले गेले. प्रत्येक विचारणा करणारा फोन सायबर फ्रॉडचा असावा, ही शंका कायम मनात असली पाहिजे.

धरून चालू की, ही महिला ज्येष्ठ नागरिक होती, भामटेगिरीची कल्पना नव्हती. पण अशाच फसवणुकीचा अनुभव टाटा हॉस्पिटलमधील उच्चशिक्षित डॉक्टर महिलेला आला. ऑनलाइन वस्तू मागवली, जी गुजरातमधील महाबली एक्स्प्रेस या कुरिअरमार्फत मिळणे अपेक्षित होते. वस्तू मिळाली नाही म्हणून फोनवर चौकशी केली असता, ‘उद्या मिळेल’ असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या नवऱ्याला, ते के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत, मेसेज आला की वस्तू जलद मिळण्यासाठी फक्त २ रुपये भरावे लागतील. मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर http://yourmoneypay.co.in जाऊन पेमेंट करण्यास सांगण्यात आले.

लिंक उघडल्यावर त्यांच्या बँकेतून २ लाख रुपये काढून घेण्यात आले. बँकेची किंवा इतर कोणतीही साईट उघडताना ती अधिकृत आणि सुरक्षित आहे ना, याची खात्री करूनच पुढे काम करावे. हे ओळखण्यासाठी बंद कुलपाचे चित्र तसेच नावाच्या अगोदर ‘https’ आहे याची खात्री करा. शेवटचा ‘s’ म्हणजे ‘सिक्युअर्ड’, सुरक्षिततेचे प्रमाणपत्र. डॉक्टरांनी उघडलेल्या वेबसाइटमध्ये ‘s’ नाही, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.

जसजसा स्मार्ट फोनचा वापर वाढतो आहे, तसतशी फसवेगिरी वाढत असून भामट्यांना नवीन रस्ताच सापडला आहे. गरिबी, बेकारी ही त्यामागची मुख्य करणे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोणतीही ऑनलाइन खरेदी करताना आपले कोणाही व्यक्तीबरोबर बोलणे होत नसते. कोणाही व्यक्तीबरोबर समोरासमोर आपला व्यवहार होत नसतो. अशा वेळी अथवा नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी शोधण्याच्या नादात ग्राहक चुकून फसव्या वेबसाइटवर जाऊ शकतो. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना नेहमीच्या साइटवरूनच करावी. ऑनलाइन व्यवहार सोयीचे जरूर, फक्त सतर्कतेने केले तरच.

आपला मित्र किंवा नातलग जेव्हा आपल्याकडे कशाची तरी मागणी करतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली तरी आपण चार प्रश्न विचरतोच. पण फोनवर मात्र आपल्याला विचारलेली माहिती, ती सुद्धा गोपनीय आपण एका झटक्यात सांगून मोकळे होतो. गंमत म्हणजे, इथे आपल्यावर कसलीही जबरदस्ती नसते की, धमकीही मिळालेली नसते. आवश्यकता नसताना ग्राहक आपणहून माहिती देऊन फसवेगिरीला मदत करत असतो. भामट्यांचे बोलणे मिठ्ठास असते. एकच नाही तर, त्यांच्या चेहऱ्यावर अनेक मास्क असतात. त्यांचा खरा चेहरा जाणणे गरजेचे असते.

ऑनलाइन खरेदी करताना ‘रिटर्न पॉलिसी’, ‘पेमेंट पद्धती’ विचारात घ्या.

सर्च करताना ग्राहक चुकून फसव्या वेबसाइटवर जाऊ शकतो.

दुकानात किंवा मॉलमध्ये आपल्या डोळ्यांसमक्ष कार्ड स्वाइप केले गेले पाहिजे.

बँकेचे व्यवहार फ्री वायफाय वापरून कधीच करू नका.

पासवर्ड परक्याला पटकन ओळखता येऊ नये, असा कठीण असावा. तो सातत्याने बदलत राहावा.

बँकेचा कस्टमर केअर नंबर जवळ असावा.

शक्यतो मुख्य रस्त्यावरील आणि जिथे पहारेकरी उपस्थित असेल अशा ATM सेंटरचाच वापर करावा.

थोडेसे पैसे देऊन SMSची सोय जरूर घ्या. त्यामुळे काही चुकीचे घडत असेल तर आपल्या लगेच लक्षात येते.

जो माणूस आपल्या ओळखीचा, नात्याचा नाही त्याची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये. सोशल मीडियावर जे फोटो, व्हीडियो परिवाराबरोबर पाहू शकतो तेच शेअर करावेत.

फसवणूक टाळण्यासाठी सातत्याने जागरूकता व सावधगिरी हीच खरी गुरुकिल्ली आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -