Wednesday, February 19, 2025
Homeताज्या घडामोडीबनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेची २४ लाखांना फसवणूक

बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेची २४ लाखांना फसवणूक

नाशिक  : बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र सोनाराकडून मिळवून त्याद्वारे बँकेकडून २४ लाखांचे कर्ज मिळवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी सुनील लक्ष्मण जोशी हे आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर शाखेचे मॅनेजर आहेत. या बँकेत सोने तारण ठेवून कर्ज दिले जाते. त्यासाठी सोने तारण नावाने वेगळा विभाग बँकेत स्थापन करण्यात आला आहे. दि. २० डिसेंबर २०२१ रोजी आयसीआयसीआय बँकेत नितीन कचरू कातोरे हा सोनेतारण कर्ज घेण्यासाठी त्याच्या ताब्यातील सोन्याचे दागिने घेऊन आला.

बँकेच्या नियमानुसार मॅनेजर जोशी यांनी १५ दिवसांपूर्वी प्राधिकृत केलेले सोन्याचे मूल्यांकनाकर नीलेश विकास विसपुते यांना सोन्याच्या मूल्यांकनासाठी बोलावले. त्यानुसार त्यांनी दागिन्यांचे मूल्यांकन केले असता त्यात २४४.७० ग्रॅम सोने व बाजारभावानुसार १० लाख २५ हजार ६२८ रुपये असल्याचा लेखी अहवाल त्यांनी दिला. त्यानुसार कर्जदार कातोरे यांना बँकेच्या नियमानुसार सर्व कागदपत्रे तपासून ७ लाख ६९ हजार २२१ रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्याच दिवशी कातोरे यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात ही रक्कम जमा केली. तसेच दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी संतोष नारायण थोरात हा सोनेतारण कर्ज घेण्यासाठी सोन्याचे दागिने घेऊन आला. या दागिन्यांचेही मूल्यांकन करण्यासाठी नीलेश विसपुते यांना बोलावले. त्यानुसार मूल्यांकन केले असता त्यात ३१० ग्रॅम सोने असल्याचा अहवाल दिला.

त्याची एकूण बाजारभावानुसार १३ लाख २९ हजार ९६४ रुपये असल्याचे अहवालात नमूद केले. त्यानुसार अर्जदार थोरात यांना बँकेच्या नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ७ लाख ७१ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले व त्याच दिवशी थोरात यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वणी शाखेत ही रक्कम जमा केली. त्यानंतर बँकेचे गोल्ड लोनचे रिजनल मॅनेजर गोविंद आमले यांना या दोन्ही कर्ज प्रकरणांतील दागिन्यांचे मूल्यांकन नीलेश विसपुते यांनीच केल्यामुळे शंका आली. त्यामुळे बँकेने प्राथमिक चौकशीकरिता या दोन्ही सोनेतारण कर्जाचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन बँकेचे प्राधिकृत मूल्यांकन करता नितीन मधुकर आघारकर यांना बँकेत बोलावून या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन केले.

त्यात नितीन कातोरे व संतोष थोरात या दोघांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचा कोणताही अंश आढळून आला नाही. यावरून या दोन्ही सोनेतारण कर्ज प्रकरणांत नीलेश विसपुते यांना हे दागिने बनावट असल्याचे माहीत असूनदेखील त्यांनी बनावट प्रमाणपत्र देऊन हे दागिने खरे असल्याचे बँकेला भासविले. त्यावरून आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर शाखेत कर्ज खातेदार नितीन कातोरे, संतोष थोरात, तसेच अंबड शाखेचे कर्जदार रावसाहेब सुकदेव कातोरे यांनी मूल्यांकनकर्ता नीलेश विसपुते याच्याशी संगनमत करून बँकेकडे बनावट दागिने खऱ्या सोन्याचे असल्याचे बनावट प्रमाणपत्राद्वारे भासवून आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर शाखेतून १५ लाख ४० हजार २२१ रुपयांचे कर्ज मिळविले व अंबड शाखेतून ८ लाख ७८ हजार १७० रुपयांचे कर्ज मिळवून बँकेची एकूण २४ लाख १८ हजार ३९१ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नितीन कातोरे, संतोष थोरात, नीलेश विसपुते व रावसाहेब कातोरे या चार जणांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -