चांदवड : वडनेर भैरव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांनी विहिरीमध्ये खाट सोडल्यानंतर त्या खाटेवर बसून हा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. याबाबत वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान मौजे पुरी, ता. चांदवड येथील सरपंच बापू भंवर यांनी वन परिमंडळ अधिकारी, वडनेरभैरव यांना दुरध्वनी संदेशान्वये माहिती दिल्याप्रमाणे धर्मा शंकर भंवर यांच्या मालकीच्या विहीरीत बिबट्या पडलेला नजरेस आला. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी विहीरीत दोरखंडाच्या सहाय्याने खाट सोडली. त्यावर पाण्यातील हा बिबट्या खाटेवर बसला.
याबाबतचा निरोप मिळताच चांदवड येथील वन परिक्षेत्र अधिकार संजय वाघमारे,, वनपरिमंडळ अधिकारी. देविदास चौधरी, वनरक्षक-वडनेरभैरव विजय टेकनर, वनरक्षक-पारेगांव वाल्मिक व्हरगळ, वनरक्षक मेसनखेडे, सुनिल खंदारे, वनमजूर वसंत देवरे, वाल्मिक निरभवणे, . भरत वाघ तसेच वाहन चालक अशोक शिंदे यांचेसह घटनास्थळी तत्काळ पोहोचले. त्या ठिकाणी विहीरीत डोकावून पाहिले असता बिबट्या हा वन्यप्राणी विहीरीत सोडलेल्या खाटेवर बसलेला दिसून आला.
वन परिमंडळ अधिकारी, मनमाड भगवान जाधव यांचेशी सपर्क करुन वन विभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकासह पाचारण करण्यात आले. या बचाव पथकाच्या मदतीने पिंजरा विहीरीत सोडल्यावर विहीरीतील बिबट्या आधी खाटेवर आणि नंतर पिंजऱ्यात अलगद शिरला. नंतर पिंजऱ्यासह बिबट्याला विहीरीतून बाहेर काढले. या बिबट्यासह (अंदाजे वय ३ ते ४ महिने) पिंजरा शासकीय वाहनाने चांदवड येथे आणून त्याची पशुधन विकास अधिकारी, चांदवड यांचेकडून वैद्यकीय तपासणी करुन घेण्यांत आली. प्रसंगी सरपंच पुरी बापू भंवर, शेत मालक धर्मा शंकर भंवर, पोलिस पाटील चिंधू आव्हाड व गांवातील नागरीक. विकास भवर, चेतन चव्हाण, संतोष जाधव, रविंद्र चव्हाण, अक्षय पवार, विजय जाधव यांनी या बचाव कार्यास मदत केली.