मुंबई :मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे (किनारी रस्ता प्रकल्प) जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२३मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांधकामात पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यातील पहिल्या बोगद्याचा २ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर, उर्वरित ७० मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या ८ ते १० दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अधिपत्याखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पातील पॅकेज ४ अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी एक अशा एकूण २ बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱ्या छोटा चौपाटी’पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते मलबार हिलच्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.
पहिल्या बोगद्याच्या एक किलोमीटरचा टप्पा ४ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला. तर, २ किलोमीटरचा टप्पा २९ डिसेंबर रोजी पूर्ण झाला आहे. पहिल्या बोगद्यासाठी उर्वरित ७० मीटर खणणे बाकी असून ते येत्या १० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्ट्ये
• एकूण १०.५८ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या (सी लिंक) दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे.
• प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.
• एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे.
– पॅकेज ४ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपूल ते प्रियदर्शिनी पार्क हे ४.०५ किलोमीटर अंतर, पॅकेज १ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस हे ३.८२ किलोमीटर अंतर आणि पॅकेज २ मध्ये बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक असे २.७१ किलोमीटर अंतर याप्रमाणे कामाची विभागणी करण्यात आली आहे.
• या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे.