Thursday, June 19, 2025

वसईत पर्यटक आणि व्यवसायिक नाराज

वसईत पर्यटक आणि व्यवसायिक नाराज

नालासोपारा : वसईत मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आणि पर्यटन स्थळे असल्याने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असतात. परंतु कोरोनाचे सावट अद्याप कायम असल्याने यावर्षी देखील नव्या वर्षाच्या पार्ट्यांना राज्य सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिक तसेच पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. तसेच पोलिसांनीही त्यादृष्टीने बंदोबस्ताची तयारी केली आहे.



वसईच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आहेत. तसेच पर्यटनासाठी वसई हे मुंबईच्या नजीक असल्याने मुंबई-ठाण्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. विशेषत: नाताळ आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी रिसॉर्ट व्यवसायिकांना चांगला फायदा होत असतो.
गेल्यावर्षी कोरोना काळात नियमांच्या बंधनात राहून हॉटेल व्यावसायिकांना काम करावे लागत होते, त्यामुळे पुरेसा फायदा झाला नव्हता. तर, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने वर्षअखेरीस फायदा होेईल, अशी अपेक्षा हॉटेल व्यावसायिकांना होती.


रिसॉर्ट आणि हॉटेल व्यवसाय अद्याप फारसा सावरलेला नसताना, आता पुन्हा रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सर्वत्र निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी दिसत आहे. थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांवर बंदी असल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.



गेल्या महिनाभरापासून थर्टी फर्स्टच्या दृष्टीने हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टची तयारी सुरू होती. पण एेन हंगामात नियम लागू झाल्याने सर्वत्र शांतता दिसून येत आहे. त्याचबरोबर थर्टीफर्स्टच्या अनुषंगाने पोलिसांची देखील सर्वत्र करडी नजर असणार आहे. दरवर्षीप्रमाणे पोलिसांकडून मुख्य रस्त्यांवर बंदोबस्त केले जाणार आहेत. तसेच नियम मोडणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर कारवाई देखील केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू झालेली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा