Thursday, July 10, 2025

मार्केट यार्डात द्राक्षांची आवक सुरू

पुणे : द्राक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात सध्या द्राक्षांची आवक वाढली असून दाखल होणाऱ्या द्राक्षांची प्रतवारी चांगली असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील द्राक्ष व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

द्राक्षांचा हंगाम डिसेंबर महिन्यात सुरू होतो. हंगाम सुरू होण्यापूर्वी बाजारात नोव्हेंबर महिन्यात बिगरहंगामी द्राक्षांची आवक झाली होती. मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज पाच ते सहा टन द्राक्षांची आवक होत आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे खराब झालेली द्राक्षे फेकून देण्यात

आल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. बाजारात सध्या चांगल्या प्रतीच्या द्राक्षांची आवक होत आहे. सांगली, इंदापूर, बारामती परिसरातून बाजारात द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षांची गोडीही चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या बाजारात जम्बो (काळी द्राक्षे), सोनाका, माणिक चमन या जातीच्या द्राक्षांची आवक होत आहे. येत्या पंधरा दिवसांत द्राक्षांची आवक आणखी वाढेल. सांगली भागातून शरद सीडलेस, कृष्णा सीडलेस या जातीच्या द्राक्षांची आवक सुरू होईल.





पुण्यातील घाऊक फळबाजारातून पुणे जिल्हा, महाबळेश्वर, लोणावळा, पाचगणी येथे द्राक्षे विक्रीस पाठविण्यात येत आहेत. पर्यटनस्थळांवरून द्राक्षांना मागणी चांगली आहे. गुजरातमधील अहमदाबाद, सुरत तसेच बडोदा येथे द्राक्षे विक्रीस पाठविण्यात येत आहेत. फेब्रुवारी, मार्च महिन्यात द्राक्षांची गोडी आणखी वाढते.
Comments
Add Comment