महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. कालीचरण महाराजाविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.
काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून कालीचरणविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही त्याने आपले वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले होते. कालीचरणविरोधात रायपूर, अकोला आणि पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरण महाराजाचा शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली. या कारवाईबाबत छत्तीसगड पोलिसांनी गुप्तता बाळगली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजविरोधात कारवाई करताना मध्य प्रदेश पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. छत्तीसगड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वास्तव्याची ठिकाणे बदलत होता. अखेर खजुराहोजवळील बगेश्वरी धाम येथील एका घरातून त्याला अटक करण्यात आली. हे घर त्याने भाडे तत्वावर घेतले होते.