कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांना सहकार समृद्धी पॅनलचे उमेदवार विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवीगाळ करीत, अंगावर धावून जात मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी घडली.
जिल्हा बँकेसाठीच्या येथील तहसील कचेरीमधील मतदान केंद्रावर सकाळी १०.४५ वा.च्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत फिर्यादीवरून सतीश सावंत यांच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादित जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत म्हणतात, जिल्हा बँक निवडणुकीत मतदान करण्यासाठी तहसील कचेरीतील मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी रांगेत त्या उभ्या होत्या. त्यावेळी त्यांना सतीश सावंत यांच्या हातात मोबाईल दिसल्याने त्यांनी तेथील कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना विचारणा केली की, मतदान केंद्रावर येताना कोणीही मोबाईल आणू नये, असा नियम असल्याने आम्ही मोबाईल गाडीत ठेवून आलो, नियम सर्वांना सारखा, मग सतीश सावंत यांच्याकडे मोबाईल कसा? अशी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांस विचारणा केली. त्यावर सतीश सावंत यांनी संजना सावंत यांना तू मला विचारणारी कोण? मी आलथू फालथू माणसांचे ऐकत नाही असं म्हणून सतीश सावंत हे संजना सावंत यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्या जोरजोरात बोलण्याचा आवाज ऐकून तेथील मतदान कक्षातून प्रज्ञा ढवण बाहेर आल्या. त्या सतीश सावंत यांना तुम्ही महिलांना असे कसे बोलू शकता, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी प्रज्ञा ढवण यांना दात तोडून टाकीन, अशी धमकी त्यांच्या वयाचा विचार नकरता सतीश सावंत यांनी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
यावेळी सतीश सावंत आपल्याला तू मतदान कशी करतेस तेच बघतो, अशीही धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या फिर्यादीवरून सतीश सावंत यांच्याविरुद्ध अश्लिल शिवीगाळ करीत अंगावर धावून जाणे, धमकी दिल्याबद्दल भादवि ५०९,३५१,५०४, ५०६ अन्वये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.