पनवेल: दोन बनावट चेकद्वारे एका व्यक्तीने चेन्नई येथील एका कंपनीच्या बँक खात्यातून 5 लाख 30 हजार रुपये आपल्या खात्यात वळती करुन सदरची रक्कम एटीएममधून काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. दिगंबर शांताराम महाडीक असे या व्यक्तीचे नाव असून अॅक्सिस बँकेने दिलेल्या तक्रारीवरुन खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात बनावट चेक तयार करुन त्याद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणातील आरोपी दिगंबर महाडीक चिपळूण येथे राहण्यास असून त्याने जानेवारी 2020 मध्ये चेन्नई येथील फ्युजी इलेक्ट्रीक कंपनीचे अॅक्सिस बँकेचे दोन चेक मिळवून त्यानुसार त्याने दोन बनावट चेक तयार केले होते. त्यानंतर त्याने सदर चेकवर बनावट सही करुन त्यावर अनुक्रमे 1 लाख 65 हजार रुपये आणि 3 लाख 65 हजार रुपयांची रक्कम टावून दोन्ही चेक खारघर येथील एयु स्मॉल फायनान्स या बँकेतील खात्यात वटविले होते. फ्युजी इलेक्ट्रीक कंपनीच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यातून तब्बल 5 लाख 30 हजार रुपयांची रक्कम परस्पर काढली गेल्याने फ्युजी कंपनीने अॅक्सिस बँकेकडे याबाबत तक्रार केली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबईतील अॅक्सिस बँकेच्या क्लियरींग विभागाकडून याबाबत शोध घेतला असता, सदरचे खाते दिगंबर महाडीक याच्या नावे असल्याचे आढळून आले. त्यामुळे अॅक्सिस बँकेच्या अधिकार्यांनी एयु स्मॉल फायनान्स बँकेकडून सदर खात्याची अधिक माहिती काढली असता दिगंबर महाडीक याचे अकाऊंट चिपळूण शाखेमध्ये असल्याचे तसेच त्याने सदरच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घेतल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच दिगंबर महाडीक चिपळूण येथे राहण्यास असून सध्या तो सणानिमित्त बाहेरगावी गेला असल्याची माहिती सुध्दा अॅक्सिस बँकेला मिळाली. दिगंबर महाडीक याने अशा पध्दतीने बनावट चेकद्वारे चेन्नई येथील कंपनी आणि अॅक्सिस बँकेची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अॅक्सिस बँकेने त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी दिगंबर महाडिक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.