Sunday, May 4, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

कामगारांच्या जीवनातील अंधार दूर झाला पाहिजे

कामगारांच्या जीवनातील अंधार दूर झाला पाहिजे
मुंबई  :शेतकरी, कष्टकरी कामगार यांच्या मुलांना चांगले मार्गदर्शन मिळाले तर, ही मुले शहरी मुलांपेक्षा जास्त फुलतात. कष्टावर विश्वास ठेवा, पृथ्वी कष्टकऱ्यांवर उभी आहे. म्हणून कष्टकरी, कामगार यांच्या जीवनातील अंधार दूर झाला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मुखपत्र ‘पोर्ट ट्रस्ट कामगार’ या रौप्यमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ताज हॉटेलवर २६/११ला अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यावेळेस मी पूर्ण माहिती घेऊनच प्रवेश केला होता. शत्रूला कधी कमजोर समजू नये. कोणत्याही युद्धात जय पराजय असतोच, मात्र हिम्मत हरायची नाही. ज्यांना स्वप्न पहायची असतात, त्यांना रात्र मोठी हवी असते, ज्यांना स्वप्न साकार करायची असतात, त्यांना दिवस मोठा हवा असतो, असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेक्रेटरी यू. आर. मोहनराजू, नुसीचे जनरल सेक्रेटरी अब्दुल गणी सेरंग, संपादक मारुती विश्वासराव, युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, युनियनचे सेक्रेटरी व अंकाचे सहसंपादक दत्ता खेसे, नुसीचे पदाधिकारी मिलिंद कांदळगावकर, सुनील नायर, सुरेश सोळंकी, सलीम झगडे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विकास नलावडे, अहमद काझी, निसार युनूस, संदीप कदम, शशिकांत बनसोडे, शीला भगत, मनीष पाटील, संदीप चेरफळे, बाळकृष्ण लोहोटे, पुंडलिक तारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी मिलिंद घनगुटकर, नंदू राणे, विजय सोमा सावंत, सेवानिवृत्त ॲसिस्टंट ट्राफिक मॅनेजर प्रकाश दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Add Comment