Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीसिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान

१९ जागांसाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ जागांसाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्या, ३० डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत १९ पैकी १८ प्रभागात एकास एक लढत तर कुडाळ तालुका शेती संस्थांमधून भाजपचे उमेदवार सुभाष मडव यांनी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्याने तिरंगी लढत आहे. तर ३१ डिसेंबरला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेत भाजप की महाविकास आघाडी सत्ता राखणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

केंद्रात नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. नगरपंचायतच्या निवडणुकासाठी मतदान जरी झालं असल तरी मतमोजणी बाकी आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या होत्या. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निकालावर सर्वांचं लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतीश सावंत हे शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपच्यावतीने विठ्ठल देसाई रिंगणात असून लक्षवेधी दुरंगी लढत आहे. या मतदारसंघात तिसरे उमेदवार सुशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दुरंगी लढत होत आहे. नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात लढत होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १९ संचालकपदासाठी ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधून २२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे कुडाळ वगळता सर्व ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. कुडाळ शेती उत्पादन मतदारसंघातून प्रकाश मोर्ये (भाजप), सुभाष मडव (भाजप) तर महाविकास आघाडीचे विद्याप्रसाद बांदेकर अशी तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे शेती उत्पादनाच्या मतदारसंघात भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.

महिला प्रतिनिधी मतदारसंघातून होणाऱ्या या लक्षवेधी निवडणुकीत कणकवलीत प्रज्ञा ढवण, अस्मिता बांदेकर (भाजप) विरुद्ध कुडाळ येथील नीता राणे व सावंतवाडीच्या अनारोजी लोबो (महाविकास आघाडी) यांच्यात लढत होणार आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आत्माराम ओटवणेकर विरुद्ध भाजपचे सुरेश चौकेकर यांच्यात लढत होणार आहे. इतर मागास मतदारसंघातून होणाऱ्या दुरंगी लढतीत भाजपचे रवींद्र मडगावकर विरुद्ध महाविकास आघाडीचे मनिष पारकर यांच्यात लढत होणार आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपचे गुलाबराव चव्हाण आणि महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी यांच्यात लढत होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -