Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीरिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे लवकरच नव्या पिढीकडे जाणार ?

रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे लवकरच नव्या पिढीकडे जाणार ?

मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे लवकरच नव्या पिढीकडे जाणार असल्याची चर्चा रंगते आहे. रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी तसे संकेतच दिले आहेत. रिलायन्सची सूत्रे नव्या पिढीच्या हाती सोपवण्यासाठीच्या प्रक्रियेला इतर वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने वेगवान करणार असल्याचे म्हटले. रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

मुकेश अंबानी यांनी यावेळी म्हटले की, मोठी स्वप्ने आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी योग्य लोकांना सोबत घेणे आणि योग्य नेतृत्व असणे आवश्यक आहे. रिलायन्स समूह महत्त्वपूर्ण नेतृत्व बदलाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. माझ्या पिढीतील सहकाऱ्यांच्या हातातून नव्या पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याची ही प्रक्रिया असणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले.

मुकेश अंबानी यांनी संपत्ती वाटपाबाबतची प्रक्रिया सुरू केली असल्याचे वृत्त मागील महिन्यात समोर आले होते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी वॉल्टन परिवाराने अवलंबलेल्या संपत्ती वाटपाच्या सूत्राला पसंती दिल्याचे वृत्त होते. याच सूत्राच्या आधारे रिलायन्समध्ये नेतृत्व बदल आणि संपत्ती वाटप होणार असल्याची चर्चा आहे. रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलपासून दूरसंचार, ई-कॉमर्स आणि ग्रीन एनर्जीच्या उद्योगात रिलायन्स उद्योगसमूह कार्यरत आहे.

मुकेश अंबानी यांना ईशा अंबानी-पिरामल, आकाश आणि अनंत ही तीन मुले आहेत. हे तिन्ही जण रिलायन्स उद्योगसमूहात सक्रिय असून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मुकेश अंबानी हे कुटुंबाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करून एका ट्रस्टसारख्या संस्थेत रुपांतर करण्यावर विचार करत असल्याचे वृत्त आहे. ही ट्रस्ट रिलायन्स उद्योगसमूहाचे व्यवस्थापन करणार असल्याची चर्चा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -