मुंबई : राज्यातील पुन्हा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रोन या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला असून थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
राज्यसरकारने नव्याने काढलेल्या नियमांतर्गत थर्टीफर्स्टच्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर, बागेत, रस्त्यावर गर्दी करू नये. सोशल डिस्टंन्टिंगचेे पालन करावे, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी अशा परिसरात नागरिकांनी गर्दी करू नये तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडता साध्या पद्धतीने घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे, राज्य सरकारने रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत केलेल्या जमावबंदीचे पालन करावे. त्याचप्रमाणे ३१ किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजन केलेल्या कार्यक्रमाला बंदिस्त सभागृहात आसनक्षमतेच्या ५० टक्के, तर खुल्या जागेत २५ टक्के लोकांनाच परवानगी असणार आहे तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्टिंगचेे पालन, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे.
विशेष म्हणजे ६० वर्षांवरील नागरिकांना आणि लहान मुलांना घराबाहेर जाण्याचे टाळावे, तर कोणतेही सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, धार्मिक स्थळी जाताना देखील कोरोना नियमाचे पालन करावे तर ३१ ला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करू नये, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यावर बंदी
मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच नव्याने आलेल्या ओमायक्रॉन विषाणूची लागण झालेले रुग्ण देखील वाढत असल्यामुळे मुंबई उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ३१ च्या सार्वजनिक पार्ट्यांवर बंदी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले आहेत. तर बंदिस्त ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले जाणार असून नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान आस्थापनांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार असून थेट सिल ठोकण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईसह राज्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असून ओमयक्रॉन रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्वभूमीवर राज्याकडून या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.