मीनाक्षी जगदाळे
अनेकदा अनेक महिलांच्या तोंडून आपण ‘मी घरीच असते,’ हे वाक्य ऐकतो. पण दरवेळी हे सांगणारी महिला कुठे तरी खेद वाटल्यासारखं, उदासपणे, अपराधी असल्यासारखं चेहरा उतरलेल्या अथवा अवघडलेल्या अवस्थेत हे सांगते, असे जाणवते.
समुपदेशन करताना देखील गृहिणी असणाऱ्या महिलांशी संवाद साधताना जाणवते की, त्या खूप मोठ्या प्रमाणात अनेक बाबतीत पतीवर, मुलांवर अथवा घरातील इतर सदस्यांवर अवलंबून आहेत. यात फक्त आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून राहणे हाच भाग नसून, कुठेही जाण्यायेण्यासाठी, बिल भरण्यासाठी, स्वतःचा मोबाइल रिचार्ज करण्यासाठी, बँकेतील अथवा बाहेरील कोणत्याही कामांसाठी, डॉक्टरकडे जाण्यासाठी, एटीएम वापरण्यासाठी, खरेदी करण्यासाठीसुद्धा त्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज पडते आहे.
अनेक महिला अशा आहेत, ज्या सुशिक्षित असूनसुद्धा त्यांनी लग्न झाल्यापासून एकट्याने घराबाहेर पाऊल पण ठेवलेले नाही, शेजारी- पाजारी जाण्या-येण्याचीही त्यांना परवानगी नाही अथवा त्यांनीही कधी तसा प्रयत्न केलेला नाही. अनेक महिला अभिमानाने सांगतात की, भाजी, किराणा, दूध, दैनंदिन वापरातील सर्व गोष्टी मला घरीच आणून दिल्या जातात. कुठेच जावं लागत नाही, मला सगळं आयतं येतं घरात. पण यातून तुम्ही स्वतःला किती कमकुवत, अधू करून घेता, हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे जीवनशैली असणाऱ्या महिला जेव्हा कोणताही कौटुंबिक प्रश्न अथवा अडचण घेऊन समुपदेशनला येतात, तेव्हा त्या आजपर्यंत कोणताच बाहेरील जगाचा अनुभव नसल्याने खूपच घाबरलेल्या, गोंधळलेल्या असतात. स्वतःच्या पतीबद्दल, त्याच्या बँक अकाऊंटबद्दल, पॉलिसीबद्दल, त्याच्या उत्पन्नाबद्दल, पगाराबद्दल, त्याने केलेल्या कर्जं प्रकरणांबाबत, देण्या-घेण्याच्या व्यवहारांबाबत पत्नी पूर्ण अंधारात असते. पती कुठे, किती, कोणावर काय खर्च करतो याबद्दल, त्याच्या स्थावर मालमत्तेबद्दल, गुंतवणुकींबद्दल, घरातील इतर आर्थिक व्यवहारांबद्दल, पतीच्या मित्र-मैत्रिणींबाबतीत, पतीचा मोबाइलमधील संपर्क याबद्दल देखील त्या पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे जाणवते. आम्हाला कधी त्यांनी अथवा घरच्यांनी याबद्दल सांगितलंच नाही अथवा आम्हाला कधी जाणून घ्यावंसं वाटलं नाही, अशी वेळ येईल, असं कुठे माहिती होतं, तशी गरजच कधी पडली नाही, अशी सर्वसाधारण उत्तरं या महिलांकडून मिळतात.
बहुतांश महिलांच्या बाबतीत तर, त्यांनी विवाह नोंदणी केली नसल्याचे समजते अथवा ती कुठे कशी करतात, याबद्दल त्यांना कल्पना नसते. अनेक महिलांकडे स्वतःची काही महत्त्वाची कागदपत्रे – जसे की, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, पासबुक, चेकबुक हे सुद्धा अपडेटेड नसते. अशा कागदपत्रांच्या बाबतीत स्वतःच्या अॅड्रेस आयडेंटिटी प्रूफच्या बाबतीत सुशिक्षित महिला देखील खूप निष्काळजी असल्याचे जाणवते. प्रापंचिक वैवाहिक जीवनात कोणत्याही स्वरूपाची अडचण आल्यावर अथवा पतीचे निधन झाल्यावर अशा प्रकारे कोणताही व्यावहारिक, बाह्य जगातील अनुभव गाठीशी नसणाऱ्या महिलांची खूपच तारांबळ होताना दिसते.
गृहिणी म्हणून, आई म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून त्या भूमिकेत अनेक महिला अतिशय उत्कृष्ट असतात. कुटुंबातील घरातील सर्व कामांची जबाबदारी त्या अतिशय व्यवस्थित पार पाडत असतात. स्वतःचे सर्व कौशल्य पणाला लावून त्या घर, संसार सांभाळत असतात. पण ज्यावेळी घराबाहेरील कोणतीही जबाबदारी, काम अथवा आव्हानात्मक प्रसंग समोर येऊन उभा राहतो, त्यावेळेस मात्र त्या हतबल होऊन जातात.
समुपदेशनादरम्यान अशा अवस्थेत असलेल्या महिलांना अतिशय बेसिक गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. अशा पद्धतीने अतिशय मर्यादित स्वरूपाचे आयुष्य जगणाऱ्या महिलांना या लेखामार्फत एक संदेश द्यावासा वाटतोय. आपल्या घराच्या कोणत्याही मर्यादा न ओलांडता, सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून देखील कृपया स्वतःला घडवत राहा, घरात राहूनसुद्धा खूप ज्ञान आत्मसात करता येते, मोबाइलवर अनेक विषयांबाबतची ऑनलाइन माहिती उपलब्ध असते, त्याचा लाभ घ्या. घरात असताना अथवा घरातील कामे करतानासुद्धा स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा, फ्रेश ठेवा. आपल्या मुलांशी, पतीशी त्यांच्या कामाबद्दल, नोकरी अथवा व्यवसायाबद्दल अभ्यासातील नवनवीन विषयांवर चर्चा करा. दररोज त्यांच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी जाणून घ्या. तुम्ही देखील बाहेरील जगात घडणाऱ्या घटना जाणून घ्यायला उत्सुक आहात, याची घरातल्या सदस्यांना जाणीव करून द्या. छोटे-छोटे आर्थिक व्यवहार, आर्थिक निर्णय स्वबळावर घेण्यासाठी प्रयत्न करा, स्वतःसाठी बचत करा, स्वतः खरेदीला जाणे, स्वतःच्या आवडी-निवडीने आवश्यक त्या गोष्टी आणणे यातून आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी मदत होईल. स्वतःच्या कागदपत्रांचे फायलिंग करणे, सर्व उपयुक्त महत्त्वाची कागदपत्रे बनवून घेणे, अपडेट्स करणे, घरातील इतर महत्त्वाच्या फाइल्स, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आपल्या शिक्षणाची प्रमाणपत्रे याबद्दल सतर्क राहा.
घर सांभाळणे ही देखील एक खूप मोठी कला आहे. घरातील सर्वांच्या मागण्या पूर्ण करणे, मूड सांभाळणे, मुले लहान असल्यास त्यांचा अभ्यास घेणे, ज्येष्ठ मंडळींची सेवासुश्रूषा, पथ्यपाणी, सणवार व्रतवैकल्य, उपास-तापास पूजापाठ सांभाळणे, पै-पाहुणा, आजारी नातेवाइकांची सेवा, वेगवेगळ्या ऋतूंमधील वेगवेगळे साठवणीचे पदार्थ बनवणे, घराची स्वच्छता, टापटीप, दररोजचा स्वयंपाक या कामात दमछाक होते, हे नक्कीच. तरी, बाहेरील जगात कुठे अडचण येणार नाही, त्या जबाबदाऱ्यासुद्धा आपण लीलया पार पाडू, यासाठी सज्ज व्हा.
[email protected]