Sunday, October 26, 2025
Happy Diwali

अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरोधात सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) बुधवारी आरोपपत्र दाखल केले. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष पीएमएलए न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये चार कोटी ७० लाख रुपये जमा केले होते. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ एप्रिलला याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ११ मे रोजी ईडीने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. बार मालकांकडून घेतलेली चार कोटी ७० लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.

ईडीने देशमुख व कुटुंबीयांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नियंत्रण असलेल्या २७ कंपन्यांची ओळख पटवली आहे. या कंपन्यांमध्ये आपापसात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याच प्रकरणात ईडी अधिक तपास करत आहे.

Comments
Add Comment