Sunday, October 26, 2025
Happy Diwali

चेतेश्वर पुजाराचा लाजिरवाणा विक्रम

मुंबई :

भारतीय कसोटी संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर के एल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी शतकी भागिदारी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. मयांक अग्रवाल ६० धावांवर बाद झाल्यानंतर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण पहिल्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला. गोल्डन डकवर बाद झाल्यासह त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेत दोन वेळा शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर कसोटी करिअरमध्ये शून्यावर बाद होण्याची त्याची ही नववी वेळ आहे. इतकेच नाही तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी दिलीप वेंगसरकर आणि पुजारा हे प्रत्येकी ८ वेळा शून्यावर बाद झाले होते. कसोटी संघात राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर सात वेळा शून्यावर बाद झाला आहे.

गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या पुजाराने २०२१ मध्ये १४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २८.५८च्या सरासरीने फक्त ६८६ धावा केल्या असून त्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या वर्षाच्या सुरुवातीला, इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर आणि नंतर परदेशात त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सतत अपयशी ठरलेला पुजारा हा आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली फलंदाजी करेल असे वाटले होते. पण पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात तो अपयशी ठरला आहे.

Comments
Add Comment