Tuesday, October 8, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम अपूर्णच

मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम अपूर्णच

चालक व प्रवाशांना नाहक त्रास

पनवेल (प्रतिनिधी) :अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून काम संथगतीने सुरू असल्यामुळे चालक आणि प्रवाशी यांना नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे मागील अनेक वर्षांपासून चौपदरीकरण करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, या महामार्गावर होत असलेल्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे लाखो लिटर इंधन वाया जात असून नागरिकांना व प्रवाशांना मोठया प्रमाणात शारिरिक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. महामार्गाच्या दहा टप्प्यांचे काम करणाऱ्या ११ पैकी मोजके कंत्राटदार वगळता अन्य कंत्राटदारांनी ६० टक्क्यांपर्यंतही काम नाही. त्यामुळे महामार्गाचे काम तातडीने पूर्णत्त्वास नेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे, असा सवाल या तारांकित प्रश्नाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शासनाला केला.

या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या पनवेल ते इंदापूर या लांबीतील चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अखत्यारीत येत असून त्यांच्यामार्फत प्रगतीपथावर आहे. सदर लांबीतील चौपदरीकरणाचे खासगीकरणांतर्गत बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या रूपात नमूद तत्वावर हाती घेण्यात आलेले काम संथ गतीने सुरू आहे. तथापि, उर्वरीत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

महामार्ग प्राधिकरणाकडून तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होऊ नयेत यादृष्टीने वाहतूक सदृश्य स्थितीत राखण्यासाठी कंत्राटदाराच्या खर्चाने व जबाबदारीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांनी कळवले आहे. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा रा.म.६६ रस्त्याच्या इंदापूर ते झाराप (कि.मी.८४/०० ते कि.मी. ४५०/१७०) या एकूण ३५५.२८५ कि.मी.लांबीतील चौपदरीकरणाचे काम राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांचेमार्फत (NH,PWD) हाती घेण्यात आले आहे. सदर लांबीपैकी एकूण २१०.५८० कि.मी. लांबीतील काम पूर्ण झाले असून उर्वरीत १४४ कि.मी. लांबीतील महामार्गाचे काम प्रगतीत आहे.

तथापि, प्रगतीपथावरील लांबीपैकी इंदापूर ते वडपाले व पर्शुराम घाट ते वाकेडमधील ११७.३६ कि.मी. लांबीचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु, सदर काम लवकर पूर्ण करण्यासाठी विविध स्तरांवर वेळोवेळी आढावा बैठका घेण्यात येऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच, प्रगतीपथावरील काम करताना वाहतूक कोंडी व अपघात होऊ नयेत, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करुन काम करण्यात येत असून सद्यस्थितीत महामार्ग सुस्थितीत आहे. सद्यस्थितीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत (NHAI) प्रगतीपथावरील चौपदरीकरणाचे काम सुमारे ८८ टक्के पूर्ण झाले असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांनी कळवले आहे.

तसेच, राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांच्यामार्फत (NH, PWD) हाती घेण्यात आलेले इंदापूर ते झाराप या लांबीतील १० टप्प्यांतील कामांमधील टप्पा क्र. ४ (कशेडी ते पर्शुराम घाट), टप्पा क्र. ८ वाटूळ ते तळगांव, टप्पा क्र. ९ तळगांव ते कळमठ व टप्पा क्र. १० कळमठ ते झाराप अशा चार टप्प्यांतील काम जवळपास पूर्ण झाले आहे व टप्पा क्र. २ वडपाले ते भोगाव खुर्द, टप्पा भोगाव खुर्द ते कशेडी या दोन टप्प्यांमधील काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरीत चार टप्प्यांमधील इंदापूर ते वडपाले व पर्शुराम घाट ते वाकेड काम प्रगतीत आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत प्रगतीपथावर असलेल्या कामासाठी सवलत करारनाम्यानुसार मूळ सवलत करार समाप्त करण्याचे आदेश दि. १७.११.२०२१ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरीत कामासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू असून सदर काम जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांनी कळवले आहे.

तसेच, राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांच्यामार्फत (NH,PWD) हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी टप्पा क्र. १ (इंदापूर ते वडपाले) व टप्पा क्र. ५, परशुराम घाट ते आरवलीच्या कामांची प्रगती लक्षात घेऊन देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार सदर काम जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे व टप्पा क्र. ६, आरवली ते कांटे व टप्पा क्र. ७, कांटे ते वाकेडमध्ये उर्वरीत कामांसाठी पर्यायी कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून त्यानुसार सदर कामे डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -