Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराणेंच्या विरोधात, शिवसेनेचा थयथयाट

राणेंच्या विरोधात, शिवसेनेचा थयथयाट

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांचे सार्वजनिक काम व त्यांची कोकणात असलेली लोकप्रियता शिवसेनेला खटकते आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोकण म्हटले की, जिकडे-तिकडे राणे परिवार दिसायला लागतो. काहीही करा, पण राणे परिवार संपत नाही आणि राणे परिवाराला एका जागी बांधून ठेवता येत नाही, ही ठाकरे सरकारची पोटदुखी आहे. शिवसेनेत असताना राणे आणि उद्धव ठाकरे यांचे कधी जमले नाही. शिवसेनेसाठी रक्ताचे पाणी केलेल्या आणि चाळीस वर्षे मुंबई व कोकणात शिवसेना घराघरांत पोहोचविण्यासाठी अहोरात्र मेहनत केलेल्या राणेंची सेनेकडून शेवटी-शेवटी उपेक्षा झाली. पण राणे खचले नाहीत. घरात मुळीच बसले नाहीत. उलट त्यांनी आपले काम मुंबई व कोकणात आणखी जोमाने चालू ठेवले. त्याचेच फळ म्हणून आज ते मोदी सरकारमध्ये केंद्रात मंत्री आहेत.

राणे हे केंद्रीय मंत्री असले तरी राज्यात विरोधी पक्षात आहेत. राणे परिवार या राज्यातील भाजपच्या आक्रमक तोफा आहेत. या तोफा ठाकरे सरकारवर रोज धडाडत असतात. सभागृहात आणि रस्त्यावर डागलेल्या तोफांनी ठाकरे सरकार वारंवार घायाळ होत असते. त्यामुळेच राणे परिवारावर कारवाई करण्यासाठी ठाकरे सरकार संधी शोधत असते. काही महिन्यांपूर्वी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सर्व प्रतिष्ठा व पोलिसांची ताकद ठाकरे सरकारने पणाला लावली होती. देशभरातील सर्व वृत्तवाहिन्यांनी त्या घटनेला तासनतास अखंड प्रसिद्धी दिली. राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतून भाजपला लोकांचा मिळणारा अफाट प्रतिसाद बघून ठाकरे सरकारला कापरे भरले होते, त्यातूनच राणेंवर कारवाई केली गेली. मंत्री अनिल परब यांनी वाट्टेल ते करा, ताकद लावून राणेंना लगेच अटक करा, असे दिलेले आदेश जेव्हा टीव्हीच्या पडद्यावर बघायला मिळाले तेव्हा ठाकरे सरकार सुडाच्या भावनेने किती पेटलेले आहे, हे लोकांना कळून चुकले.

तेव्हा वडिलांवर कारवाई केली आता मुलांवर कारवाई करण्यासाठी ठाकरे सरकारचे हात शिवशिवत आहे. निमित्त मिळाले ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे. या बँकेची निवडणूक ३० डिसेंबरला होणार आहे. १९ जागांसाठी मतदान असून साडेनऊशे मतदार आहेत. याच जिल्ह्यात देवगड, वैभववाडी, कुडाळ व दोडामार्ग अशा चार नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका आहेत. त्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. अर्थात, राणे परिवाराने केलेले काम ही त्यामागची पुण्याई आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींमध्येही ९० टक्के यश भाजपला मिळाले. त्यामुळे काहीही करून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरील आपला ताबा कायम ठेवण्यासाठी ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र झाले आहेत. सिंधुदुर्ग बँक भाजपला मिळता कामा नये व या बँकेवर राणेंचे वर्चस्व राहता कामा नये, असा चंग महाआघाडीने बांधला आहे. त्यातूनच नितेश राणे यांना संतोष परबवर झालेल्या हल्ला प्रकरणात गोवण्याचा पद्धतशीर प्रयत्न होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील अशा आघाडीच्या त्रयींनी सिंधुदुर्ग भेटीत राणेंच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण राणेंचे काम एवढे मोठे आहे की, एक दिवस येऊन त्यांच्यावर टीका केल्याने त्यांच्या साम्राज्याला किंचितही तडा जाणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत २००९ मध्ये आठशे रूपयांच्या ठेवी होत्या, त्या आता अडीच हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. याचे श्रेय नारायण राणे यांच्या कामालाच आहे. २०१९ मध्ये सतीश सावंत त्यांची साथ सोडून गेले व तेच आता बँक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी धडपड करीत आहेत. दोन वर्षांत त्यांनी केलेल्या मनमानी कारभाराने बँक अडचणीत सापडली.

वादग्रस्त जरंडेश्वर कारखान्याला कोणाच्या शिफारसीवरून या बँकेने कर्ज दिले, त्याची चर्चा विधानसभेत का कोणी उपस्थित केली नाही? राणे समर्थकांच्या ताब्यात बँक जाता कामा नये, यासाठी महाआघाडीच्या नेत्यांची फौज सिंधुदुर्गमध्ये आली व गेली. महाआघाडीच्या प्रचारात कोण गुंड गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत, ते अजित पवार व उदय सामंत यांना माहिती नाही, असे कसे म्हणता येईल? ज्यांनी बुडीत कारखान्यांना चारशे कोटींची कर्जे खिरापतीसारखी वाटली त्यांच्या ताब्यात पुन्हा कारभाराच्या चाव्या द्यायच्या का? मतदारांच्या नातेवाइकांना रोजगार दिल्याचा देखावा केला. पण त्यांना साधी नेमणूक पत्रेही दिली नाहीत. त्यांच्यावर मतदार विश्वास ठेवतील काय?
संतोष परबवर हल्ला झाल्यानंतर तब्बल सोळा दिवसांनी शिवसेनेचे आमदार स्थानिक पोलीस ठाण्यावर गेले व आमदार नितेश राणे हे सूत्रधार असून त्यांना अटक करा, म्हणून पोलिसांकडे मागणी केली.

हीच मागणी शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत उचलून धरली. या हल्ल्यात कोणीही गुंतलेले असले तरी सरकार त्यांना सोडणार नाही, असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले. जणू नितेश राणे यांना अटक करण्यासाठी सरकारने सापळा रचला आहे, असे चित्र दिसून येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रवेशाच्या वेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसलेल्या नितेश राणेंनी ‘म्याव, म्याव’ असा आवाज काढला म्हणून शिवसेना दुखावली गेली. नितेश राणे यांना कायमस्वरूपी निलंबित करा व सभागृहात येऊन त्यांनी माफी मागा, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली. गेल्या आठवड्यात भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केली म्हणून त्यांना माफी मागणे भाग पडले. त्याचा बदला म्हणून शिवसेना ही राणेंच्या विरोधात सुडाचे राजकारण खेळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -