
नाशिक : समाजासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची ‘सुविचार गौरव’ पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेत्री पूजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश आहे.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रस्तावही मागविण्यात आले होते. सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
हेमंत राठी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्णसेवेसाठी डॉ. अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गोरवाडकर हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तींची निवड केली आहे. रविवार, २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड.अशोक खुटाडे व सचिव अॅड. रवींद्रनाना पगार यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला नाशिक पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.