Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमी‘माय होम इंडिया’

‘माय होम इंडिया’

शिबानी जोशी

भारत देश खूप मोठ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला देश आहे. यात निसर्ग संपदेने समृद्ध असलेला, सांस्कृतिक वैविध्य असलेला पण तरीही उर्वरित भारताकडून काहीसा दुर्लक्षित राहिलेला महत्त्वाचा भाग म्हणजे ईशान्येकडील राज्य होत. कुठे बर्फाच्छादित प्रदेश, तर कुठे दाट जंगल संपत्ती, ब्रह्मपुत्रेसारख्या मोठ्या नदीचे पात्र, अनेक जन-जाती तसेच निसर्गाचं सढळहस्ते वरदान लाभलेल्या अशा या निसर्ग संपन्न भागात वैविध्य भरलं आहे. अरुणाचल प्रदेशला तर उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हटलं जातं. नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगलादेश अशा देशांच्या सीमा अन्य कोणत्याच राज्यांना जोडल्या गेल्या नसतील. त्यामुळे हे क्षेत्र तसं सेन्सिटिव्ह म्हणता येईल. दुर्दैवानं देशाच्या एका कोपऱ्यात असलेल्या या राज्यांकडे पूर्वी इतर राज्यांतील लोकांचे विशेष लक्ष नव्हतं. विशेष माहिती नव्हती.

तसेच तिथल्या लोकांनाही वेगळे असल्याची भावना मनात असायची. वंचितपणाची तसेच उपेक्षेची भावना त्यांच्या मनात होती. त्यांच्या मनातील ही तूट भरून काढण्यासाठी तसेच ‘एक्सक्लुजन सिंड्रोम’ची भावना काढून टाकण्यासाठी ज्या ‘माय होम इंडिया’ या संघटनेची स्थापना झाली, त्या संस्थेची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

ईशान्येकडील मदतीचा हात देणारे विनोद बावरी आणि ईशान्येचा भाग पिंजून तिथल्या समस्यांची जाण असणारे सुनील देवधर यांनी ईशान्येकडचे लोक व उर्वरित भारतातील लोकांमध्ये बंधुत्वाचा शाश्वत दुवा सांधण्यासाठी ‘माय होम इंडिया’ची २००५ मध्ये स्थापना केली. सुनील देवधर यांच्या मनात अशा प्रकारची संस्था स्थापन करण्याचं निश्चित होण्याला त्या काळातल्या दोन घटनांचं निमित्त झालं. कोणालाही वाटेल एक मराठी माणूस आणि ईशान्येकडच्या राज्यांसाठी इतकं काम करतोय, हे कसं घडलं? अर्थातच याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार कारणीभूत झाले. सुनील देवधर हे १९९१ ते ९९ या कालावधीत मेघालयमध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते. शिलाँगमध्ये ते राहत असताना, मेघालयमधून शिकण्यासाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांवर मध्य प्रदेशातल्या सागर इथे रॅगिंग झालं.

रॅगिंगच प्रमाण इतकं गंभीर होतं की, आपलं शिक्षण सोडून हे विद्यार्थी मेघालयमध्ये परत आले आणि त्यांनी उर्वरित भारतात आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची कहाणी सांगितली. दुसऱ्या दिवशी तिथे एका स्टुडंट युनियनने पत्रके वाटली. त्यात लिहिलं होतं, ‘सी हाऊ इंडियन्स आर बिहेविंग विथ अस.’ १९९३ मध्ये इन्स्पेक्टर ऑफ स्कूल असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मुलावरही लखनऊमध्ये असाच प्रसंग घडला. हा मुलगा मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेला असताना त्यालाही तशाच प्रकारचा त्रास झाला. तसंच उर्वरित भारतातील मुलं आपल्याशी मैत्री करत नाहीत, वेगळ्या दृष्टीने पाहतात हे त्याने आपल्या वडिलांना बोलून दाखवलं. संघाचे कार्यकर्ते त्यांचे परिचित असल्यामुळे त्यानी लखनऊतील प्रांत प्रचारकांच्या कानावर ही गोष्ट घातली.

तद्नंतर हा प्रश्न जरी सुटला असला आणि तो व्यवस्थित पाच वर्षे शिकून डॉक्टर होऊन परतला व पूर्ण राष्ट्रवादी विचारांचा झाला, तरी या दोन घटनांमुळे ईशान्येकडील नागरिक आणि उर्वरित भारतातील नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे, हे सुनील देवधर यांच्या लक्षात आले. या लोकांना केवळ आपुलकी किंवा प्रेम दर्शवलं तरीही आपल्यातले बंध घट्ट विणले जाऊ शकतात, हे लक्षात आल्यामुळे ‘माय होम इंडिया’ची स्थापना झाली. संस्थेचा हेतू ईशान्येकडील नागरिकांना ‘माय होम इंडिया’, ‘भारत मेरा घर’ वाटू लागणं आणि उर्वरित राज्यातील नागरिकांना ईशान्येकडील राज्यांची माहिती होऊन त्यांचा संपर्क वाढवणे हा आहे. ‘माय होम इंडिया’तर्फे ईशान्येकडच्या लोकांसाठी दहा-बारा मोठी कार्ये केली जातात. त्यातील सर्वात प्रथम म्हणजे हेल्पलाइन क्रमांक सुरू केला गेला.

या हेल्पलाइन क्रमांकावरून लोकांना काही तक्रार असेल, तर त्याची तक्रार नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. या हेल्पलाइनचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला आहे. दुसरा उपक्रम म्हणजे ‘नेस्ट फेस्ट’. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये लोकपरंपरा, लोकनृत्य, लोकगीतांची रेलचेल आहे. या सांस्कृतिक संपदांची इतर राज्यांना माहिती व्हावी म्हणून इतर राज्यांमध्ये ईशान्येकडील सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जातात. आपल्याला माहीत आहेच की, ईशान्यकडील अनेक कडक्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतच नाव राखलं आहे. याचं कारण मुळात तिथले लोक काटक असतात. फुटबॉल तसेच धनुर्विद्या (आर्चरी) या खेळांमध्ये, तर अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत. म्हणूनच ईशान्येकडच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, या हेतूनं देशातल्या इतर मोठ्या शहरांमध्ये त्यांच्यासाठी फुटबॉल स्पर्धा २००८ पासून आयोजित केल्या जातात.

ईशान्येकडील विद्यार्थी आज देशातल्या इतर राज्यांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यांना मदतीचा हात देण्याचं काम ‘माय होम इंडिया’ विविध राज्यात करत असते. ही मुलं थोडी वेगळी दिसत असली तरी तीसुद्धा आपल्या देशातीलच आहेत. ही भावना इतर राज्यांतील नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे कार्यक्रम माय होम इंडिया आयोजित करत असते. २०१०पासून ‘वन इंडिया अॅवॉर्ड’ हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार संस्थेतर्फे दिला जातो. ईशान्य भारतात विविध क्षेत्रांत भारतीय राष्ट्रवाद प्रबळ करण्यासाठी ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य समर्पित केलं, अशा जेष्ठ व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार मुंबईमध्ये दिला जातो. आतापर्यंत जगप्रसिद्ध महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम, केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू, गायिका लैश्राम मेमा, छोदेन लेपचा, समाजसेवक अरीबम शर्मा, पद्मश्री पॅट्रिशिया मुखीम, हिंदी भाषेचा तिथे प्रसार करणारे पियोंग जमीर अशा अनेकांना ईशान्येकडच्या भरीव योगदानाबद्दल मुंबईत सन्मानित करण्यात आलं आहे.

२०१३ पासून आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रात ईशान्येकडे काम करणाऱ्यांना कर्मयोगी पुरस्कारही संस्थेतर्फे दिले जातात. यात स्वामी चित्तरंजन देव बर्मा, कॅप्टन अशोक टिपणीस, पर्यावरणवादी जादव पायेंग, नागालँड येथील गांधीवादी पद्मश्री नटवर भाई ठक्कर यांचा समावेश आहे. ईशान्येकडे ही लोकं भरपूर कार्य करत आहेत. त्यांचं कार्य उर्वरित भारतासमोर आणावं तसंच त्यांनाही काम करायला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे दोन पुरस्कार खास ईशान्येकडील व्यक्तींना देऊन सन्मानित केलं जातं. हे पुरस्कार देण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आले होते. तसेच अमित शहा, लालकृष्ण आडवाणी, सरसंघचालक मोहन भागवत, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेते ईशान्येवरील प्रेमामुळे आवर्जून उपस्थित राहिले आहेत.

ईशान्येकडून बऱ्याच वेळा मुलांना जाळ्यात ओढून पळवून आणलं जातं. तस्करी केली जाते किंवा कधीकधी तिथली मुलं मोठी स्वप्न उराशी बाळगून घरातून पलायन करतात. अशी मुलं इथे सापडल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात ठेवलं जातं; परंतु या सुधारगृहांमध्ये खितपत त्यांचं आयुष्य अधिकच क्लिष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवावं, या उद्देशाने ‘सपनों से अपनों तक’ ही योजना संस्थेने सुरू केली आहे. काही वर्षांपूर्वी ईशान्येकडून ६८ मुला-मुलींचे ट्रॅफिकिंग झालं होतं. त्या मुलांची सोडवणूक करून त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत नेऊन सोडण्याचे खूप अवघड आणि नाजूक काम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. आतापर्यंत अशा २७०० मुला-मुलींची सोडवणूक संस्थेने केली आहे.

‘राष्ट्रवाद पर मंथन’ ही एकदिवसीय कार्यशाळा दरवर्षी देशभरात आयोजित केली जाते. यामध्ये अनेक तज्ज्ञ आपले विचार मांडायला येत असतात. यात सत्येंद्र सिंग, रमेश पतंगे, विनय सहस्रबुद्धे, सुनील देवधर अशांनी राष्ट्रवादावर प्रेरित विचार मांडले आहेत. काही विद्यापीठांतून दोनशे-अडीचशे विद्यार्थी दिल्लीत येऊन या अभियानात सहभागी होतात. याशिवाय ‘ब्रदरहूड डे’, ‘समरसता सहभोज’, ‘दर्द से हम दर्द तक’ असे उपक्रमही राबवले जातात.

देशातील विविध भागांत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ‘जन आरोग्य रक्षा’ हा उपक्रमदेखील राबवला जातो. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना उपचार आणि सेवा पुरवण्यात आल्या आहेत. गुवाहाटी, सिलचर, मणिपूर, पुणे येथे स्वास्थ्य सेवा सदन उभारण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिलं आहे म्हणूनच ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’ हे अभियान राबवले जाते. देशातील वेगवेगळ्या शहरांत सार्वजनिक ठिकाणी, नदीकिनारी स्वच्छता अभियान राबवले जाते. हेच सर्व उपक्रम आणखी मोठ्या स्तरावर भविष्यात राबवण्याचा संस्थेचा विचार आहे. दरम्यान ‘माय होम इंडिया’तर्फे उद्या म्हणजे बुधवारी (२९ डिसेंबर) यंदाचा ‘वन इंडिया पुरस्कार’ वितरित होत आहे. मेघालयातील सुप्रसिद्ध लेखक, गायक, कवी, समाजसेवक कोटीयेंट सुमेर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
joshishibani@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -