Sunday, October 26, 2025
Happy Diwali

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सिन्नर: सिन्नर जवळ पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये बिबट्या ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शव ताब्यात घेतले. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सातत्याने बिबट्यांचा वावर सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या कासारवाडी येथे बिबट्या दिसला होता. त्यानंतर याबाबतची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. वनविभागाने या दृष्टिकोनातून पुढील पावले देखील उचलली होती. बिबट्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक - पुणे महामार्गावरील बायपास रस्त्यावर मनेगाव शिवारात भोजने फार्मजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणारा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. वनविभागाचे कर्मचारी तातडीने या बिबट्याचे शव ताब्यात घेतले असून पंचनाम्यासाठी तसेच पुढील कारवाईसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
Comments
Add Comment