Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीप्रकाशाचा ‘किरण’ घेऊन अंधांच्या विवाह सोहळ्यात कन्यादानाची ‘जनसेवा’

प्रकाशाचा ‘किरण’ घेऊन अंधांच्या विवाह सोहळ्यात कन्यादानाची ‘जनसेवा’

इगतपुरी: ज्यांच्या जीवनात अंधाराचे साम्राज्य आ वासून जन्मापासून भोगावे लागले आहे, अशा अंधांच्या आयुष्यात फक्त उपेक्षाच वाट्याला येते. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे साम्राज्य उभे करून अंधाराला बाजूला करता येते. मात्र प्रयत्न तोकडे पडतात. जीवनाचा अनमोल खजिना असणारा विवाह सोहळा तर फार क्वचितच त्यांच्या वाट्याला येतो. विवाह झालाच तर उपेक्षेच्या बोज्याने गरिबीचा संसार कसाबसा करावा लागतो. मात्र, अशाच अंध:काराने व्यापलेल्या अंध वधू-वरांच्या जिंदगीत प्रकाश निर्माण करण्यासाठी इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठान सरसावली आहे. गरीब कुटुंबांतील अंधांच्या लग्नात कन्यादान म्हणून लागणाऱ्या सर्वच चीजवस्तू जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवाह सोहळ्यात अर्पित करण्यात आल्या. ह्या अनोख्या सोहळ्यात गहिवरलेल्या अंध दाम्पत्याच्या दृष्टिहीन डोळ्यांतून आनंदाचे अश्रू तरळू लागले. यावेळी उपस्थितांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली.

इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथील चि. केतन संतोष भटाटे आणि अलिबाग जिल्ह्यातील मांडवा येथील वृषाली हिराचंद डोळे ह्या अंध वधू-वरांचा विवाह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होत होता. आधाराच्या प्रकाशाचा कवडसा सुद्धा दिसत नसतांना हा अनोखा विवाह सोहळा पार पडणार होता. डोळे असूनही अंध बनलेल्या मग्रूर समाजाला मात्र ह्याची खबरबात नव्हती. अंध नवरीच्यावतीने कन्यादानासाठी मदतीची गरज होती. ‘इगतपुरीनामा’चे मुख्य संपादक भास्कर सोनवणे यांना याबाबतची माहिती समजल्याने त्यांनी तातडीने जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. फलटणकर यांनीही याबाबत प्रतिष्ठानच्या सदस्यांना मुलीच्या कन्यादानासाठी मदतीचे आवाहन केले. अवघ्या अर्धा तासात मदतीचा ओघ सदस्यांनी सुरू केला. ह्या मदतीतून अंध दाम्पत्यासाठी संसारासाठी लागणारी सर्व भांडीकुंडी, रॅक, पूजेचे साहित्य वगैरे खरेदी करण्यात आली.

लग्नसोहळा सुरू असताना जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर, ताराचंद भरिंडवाल, अजित पारख, गौतम दर्डा, निलकमल रावत, रामानंद बर्वे, शांतीलाल चांडक, विजय गुप्ता, प्रकाश नावंदर, सुनील आहेर, घनश्याम रावत, प्रमोद व्यास, विनोद गोसावी, जे. के. मानवडे, हिरामण लहाने, अस्लम शेख, जगदीश बबेरवाल, रमेश चोप्रा, वीरेंद्र परदेशी, गिरीश भुतडा, सागर परदेशी, सतीश मोरवाल, करनाराम बबेरवाल आदींनी कन्यादानाचे अर्पण अंध दाम्पत्याला केले. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सपन परदेशी, अनुसयात्मज मतिमंद विद्यालय इगतपुरीच्या मुख्याध्यपिका हेमलता जाधव, मराठे मॅडम, फड मॅडम, पंचायत समितीचे विशेष शिक्षक बाप्पा गतीर आदी उपस्थित होते.

जनसेवा प्रतिष्ठानचे आम्ही आजन्म ऋणी आहोत- सौ. वृषाली आणि श्री. केतन, अंध नवदाम्पत्य

आमचं आयुष्य अंधाराने व्यापले आहे. अशा अंधारात प्रकाशाचा एक ‘किरण’ आम्हाला ‘जनसेवा’ म्हणजे काय असते, ह्याचे उत्तम उदाहरण देऊन गेला. आम्हाला स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि कन्यादान म्हणून अमोल मदत करण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या जनसेवा प्रतिष्ठानचे आम्ही आजन्म ऋणी आहोत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -