Saturday, October 25, 2025
Happy Diwali

विशाल निकम ठरला “बिग बॉस मराठी सिझन 3” चा महाविजेता !

विशाल निकम ठरला “बिग बॉस मराठी सिझन 3” चा महाविजेता !

मुंबई : बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता विशाल निकम ठरला आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरत त्याने हा बहुमान पटकावला आहे. विशाल निकमला २० लाख इतकी धनराशी मिळाली आहे. तसंच बिग बॉसची मानाची ट्रॉफीही मिळाली. या रिऍलिटी शोमध्ये जय दुधाणेने  दुसरे स्थान पटकावले.

१०० दिवस, १७ सदस्य आणि एक ट्रॉफी ! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होते विजेता कोणी एकच असणार आहे. कार्यक्रमाच्या तिसर्‍या पर्वाला देखिल संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्‍या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्‍या नात्यांविषयीची असो. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता मिळाला. विशाल निकम ठरला बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता तर जय दुधाणेने पटकावले दुसरे स्थान. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या तिसर्‍या पर्वाचा विजेता ठरला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा