
वाढदिवसाच्या दिवशी सलमान खानने माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सलमानने सांगितलं की, फार्म हाऊसमधील खोलीत सापाने शिरकाव केला. त्यावेळी घरातील लहान मुले प्रचंड घाबरली होती. सापाला बाहेर काढण्यासाठी मी लाकडाची काठी मागितली, ती लहान होती. त्यानंतर लाकडाची मोठी काठी मला देण्यात आली. या काठीच्या आधारे मी सापाला काळजीपूर्वक उचलले आणि घराबाहेर आणले. काठीवर असलेला साप माझ्या हाताच्या दिशेने येत होता. सापाला घराबाहेर नेत असताना मी दुसऱ्या हातात काठी घेतली आणि त्याला घराबाहेर सोडले.
सलमान खानने म्हटले की, तो साप कंदारी प्रकारचा होता आणि त्या ठिकाणी होत असलेल्या आरडाओरड, गोंधळामुळे सापाने एकदा नव्हे तर तीनदा दंश केला. त्यानंतर आम्ही रुग्णालयात गेलो. त्या ठिकाणी मला अॅण्टी-वेनम इंजेक्शन देण्यात आले. आतापर्यंत मी सर्व प्रकारचे अॅण्टी-वेनम इंजेक्शन घेतले असल्याचे सलमान खानने म्हटले.
सलमानने पुढे सांगितले की, सर्पदंशाच्या घटनेनंतर त्याला 6 तास रुग्णालयात ठेवण्यात आले होते, त्यानंतर त्याला घरी येण्याची परवानगी देण्यात आली. साप चावल्यानंतर सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सलमान म्हणाला, हॉस्पिटल सर्व सुविधांनी सुसज्ज होते. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे अँटी व्हेनम उपलब्ध होते." स्थानिक पोलीस आयुक्त बिपिन कुमार आणि आमदार संदीप नाईकदेखील तेथे दाखल झाले.