
यापूर्वी पहिल्या लाटेत दोन वेळा आणि त्यानंतर दुसऱ्या लाटेतही एक वेळा राजापूर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा शून्यावर येऊन तालुका कोरोनामुक्त झाला होता. मात्र पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने हा आकडा वाढला होता. मात्र दुसऱ्या लाटेत पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तालुक्यातील ओणी, रायपाटण येथील कोविड रुग्णालये व धारतळे, हातिवले व रायपाटण येथील कोविड केअर सेंटरही बंद करण्यात आलेले आहेत.
गेल्या आठवडाभरात तालुक्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही. जो एक कोरोनाबाधित रूग्ण होता व ज्याच्यावर उपचार सुरू होते, तो शनिवारी पूर्णपणे बरा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता शून्य झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि जनतेला देखील दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात आजपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकूण ५ हजार १८८ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यातील ४ हजार ९८४ रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजपर्यंत तालुक्यात २०४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या एकही रूग्ण तालुक्यात अॅक्टीव्ह नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शून्य इतकी आहे.