पुणे : पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांत सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत.
काही महिन्यांपासून राज्यातील कोरोनाविषयक परिस्थिती आटोक्यात आली होती. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून महाविद्यालयांसह सर्व काही खुले करण्यात आले. मात्र, महिन्याभरापासून राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, याबाबत निर्णय घेतला गेला नाही. विद्यापीठाच्या चारही अधिष्ठातांची समिती स्थापन करून या समितीकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय सोपविण्यात आला आहे.
परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाच्या चारही अधिष्ठातांची बैठक गेल्या आठवड्यात होणार होती. मात्र, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. विद्यापीठातर्फे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना एक महिना आधी परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन हे समजणे अपेक्षित आहे.