मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरानमध्ये धूळविरहित रस्ते व्हावेत जेणेकरून पावसाळ्यात होणारी मातीची धूप कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक क्लेपेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांना मान्यता दिल्यामुळे गावातील अनेक भागात असे रस्ते बनवण्यासाठी मागील दोन वर्षांपासून सपाटा सुरू आहे. त्यामुळेच सध्यातरी इथे तितकासा घोड्यांच्या लीदमिश्रित धुळीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. धुळीचे प्रमाण कमी होत आहे. माथेरानमध्ये सर्वत्र लाल मातीचेच रस्ते पूर्वापार आहेत. या कामी पर्यटकांना सहज चालण्यासाठी त्याचप्रमाणे हातरिक्षा चालकांना अधिक श्रम होऊ नयेत यासाठी हे रस्ते खास आकर्षण ठरत आहेत.
विविध ठिकाणी क्लेपेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु, ही कामे पूर्ण करताना त्यावर नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींचा अथवा अभियंत्यांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नसल्याने होत असलेली कामे खूपच घाईगडबडीने पूर्ण करून बिले काढण्यासाठी ठेकेदारांची लगबग होताना दिसते. या रस्त्यांच्या बाजूला पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जांभ्या दगडात गटारे बनवली जात आहेत. त्याठिकाणीसुध्दा आजूबाजूला असलेल्या हॉटेलसमोरील जागेवर उंचवटा करून एकप्रकारे त्या-त्या हॉटेलधारकांना संरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे हेच हॉटेलधारक काही दिवसांत त्याठिकाणी आपला हक्क बजावण्याची दाट शक्यता आहे. तथापि, हे रस्ते बनवताना लावण्यात येणारे ब्लॉक दर्जेदार आहेत का, याबाबत कुणालाही काही स्वारस्य दिसत नाही.
येथील हॉटेल प्रीतीसमोरील अशाच प्रकारच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी खूपच घाई केलेली दिसत असून त्याभागात ही कामे रात्रीच्या वेळी करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेकेदारांनी उतारसुध्दा दिलेला नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम एकसंध नसून लावलेले ब्लॉक लवकरच पूर्णपणे सपाट झालेले दिसत आहेत. यावरून वर्दळ असल्याने जागोजागी खड्डे पडलेले आहेत. बहुतांश कामांची भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या पाट्या लावल्यानंतर त्या निकृष्ट कामांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.
तसेच, तेथूनच पेमास्टर पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्लॉक येण्याच्या अगोदरच अनेक महिन्यांपूर्वी त्याठिकाणी खडी अंथरून ठेवली आहे. त्यामुळे हातरिक्षा चालकांना, घोडेवाले त्याचप्रमाणे पायी चालत जाणाऱ्या पर्यटकांना, त्या भागातील रहिवाशांना खूपच त्रासदायक बनलेले आहे. दोन वर्षांपूर्वी काही ठिकाणी असे रस्ते बनवताना थोडीशी चूक आढळून आल्यावर गावातील काही मंडळींनी मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव केला होता. ती मंडळी सद्यस्थितीत होत असणाऱ्या निकृष्ट कामांबाबतीत मूग गिळून का गप्प बसले आहेत की त्यांच्या बेभान सुटलेल्या जिभेवर कुणा ठेकेदारांमार्फत गुळाचा खडा तर ठेवला नाही ना, असाही सवाल यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पुढे कामांबाबतीत असे होऊ नये
दरम्यान, या साऱ्या पार्श्वभूमीवर निदान आगामी काळात आणि यापुढे होणारी कामे चिरकाळ तग धरू शकतील अशाप्रकारे करावीत, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच या छोट्याशा गावाला आणि विशेष करून ‘क’ वर्ग असणाऱ्या माथेरान नगरपरिषदेला सातत्याने भरीव निधी उपलब्ध होऊ शकत नाही, असे ज्येष्ठ नागरिकांमधून बोलले जात आहे.