Tuesday, July 1, 2025

कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल; समुद्रकिनारे गजबजले

कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल; समुद्रकिनारे गजबजले

रत्नागिरी :नाताळ सणानंतर आता नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात दाखल झालेल्या हजारो पर्यटकांनी कोकण हाऊसफुल्ल झाले आहे. पर्यटकांचा सर्वाधिक ओढा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून दोन्ही जिल्ह्यातील हॉटेल्ससह एमटीडीसीची रिसॉर्टदेखील फुल्ल झाली आहेत. यावर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून कोकणातील पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वाधिक पसंती समुद्र किनाऱ्यांना दिल्याने रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील प्रत्येक समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजून गेले आहेत.


राज्यासह इतर राज्यांतील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. या पर्यटकांसाठी शासनाने काही विशेष सुविधा पुरवल्या नसल्या तरी येथील निवास, न्याहारी, हॉटेल्स तसेच ग्रामीण पर्यटनावर आधारित अशा सुविधा, वॉटर स्पोर्ट्स अशा सर्व सोयींमुळे पर्यटक आता कोकणात स्थिरावू लागले आहेत. पर्यटकांचा ओढा हा समुद्रकिनाऱ्यांकडे अधिक असून तेथे आनंद लुटतानाच पर्यटक जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचीही सैर करू लागले आहेत. परिणामी आतापर्यंत गाडीतून कोकणचे दर्शन घेत गोव्याकडे धाव घेणारे पर्यटक आता येथे स्थिरावू लागले असल्याने खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसाय आता रुजू लागल्याचे दिसत आहे.


असे असले तरी शासनाने या पर्यटन व्यवसायाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी नववर्ष स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांनादेखील आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >