‘गोव्यातील ख्रिसमस’

मृणालिनी कुलकर्णी


पोर्तुगीजांची पूर्वीची वसाहत असलेल्या गोव्यात आजही ख्रिसमस हा एक आंनदोत्सव असतो. संपूर्ण गोवा ख्रिसमस उत्सवात रंगलेला असतो. गोव्यातील सर्व चर्चमध्ये येशूच्या जन्माच्या स्मरणार्थ मध्यरात्री मास (प्रार्थना) आयोजित करतात. कॅरोल्स संगीताने प्रचंड समुदाय भारावून जातो. चर्चमध्ये जाण्यासाठी, नाईट लाइफ एन्जॉय करण्यासाठी गोवा हे योग्य ठिकाण आहे. संगीत, नृत्य, पार्ट्या आणि भरगच्च पदार्थांनी भरलेले खाणे, पिणे हे गोव्यातील ख्रिसमसचे वैशिष्ट्य. भारतात कुठेही गोव्यासारखा ख्रिसमस साजरा होत नसल्यामुळे अनेकजण ख्रिसमसचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येतात. यासाठीच आम्ही दोघे यांचा विद्यार्थी डॉ. प्रसाद केरकर याच्या गोव्यातील साखळी गावी गेलो होतो.

ख्रिसमसच्या पूर्व संध्येलाच आजूबाजूची घरे फुलांनी, सुगंधित मेणबत्त्यांनी, ताऱ्यांच्या आकाश कंदिलांनी सजताना पाहत होते. ख्रिसमस सणाची सुरुवात बॉल्स, बेल्स, गिफ्ट्स, स्टार्स, कॅडीस्टीक, सॉक्स या वस्तूंनी ख्रिसमस ट्री सजविण्यापासून होते.घराघरांत वेगवेगळ्या साच्यात ख्रिसमस क्रिब (येशू बाळाच्या जन्माचे घरकूल) हे एक आकर्षण असते. घरे दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली होती. प्रत्येक घराघरांतून कॅरोल्स संगीताचा प्रतिध्वनी, केकचा वास बाहेर येत होता. ख्रिसमस उत्सवाची सुरुवात कॅरोल्स गाण्याने होते. नंतर चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात. ‘हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत, भेटवस्तू देतात. मित्र-मंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात.

ख्रिसमसच्या दिवशीच संध्याकाळी माशेलमार्गे लागणाऱ्या सॅन्टिस्टव्ह बेटाच्या इथे प्रसादचे मित्र डॉ. जॅकी फर्नांडिसांकडे गेलो. ख्रिसमसच्या वस्तूंनी, दिव्याच्या माळांनी सजलेल्या घरात, गप्पाटप्पांच्या उत्साही वातावरणात ख्रिसमसचा विशेष फराळ आणि घरगुती केक, चॉकलेटमुळे स्वागताचा गोडवा अधिक वाढला. या गावात बहुसंख्य ख्रिश्चनच आहेत. बाहेर फेरफटका मारताना, ख्रिसमसच्या प्रतीकांनी, चांदण्यांच्या आकाशकंदिलांनी, दिव्याच्या रोषणाईने गल्ली न् गल्ली सजलेली होती. प्रत्येक ठिकाणच्या कोपऱ्यात मेणबत्ती तेवत होती. रस्त्यांवर जागोजागी सजलेल्या ख्रिसमस ट्रीप्रमाणेच इतर झाडेही दिव्यांच्या माळांनी सजवली होती. काही झाडांच्या बुंध्याशी मेरी ख्रिसमस, प्रभू येशू, सांताक्लॉज यांचे पुतळे उभे करून ठेवले होते.

एका गल्लीत प्रभू येशूचा गोठ्यातील जन्म, येशूचा राहता परिसर, त्याच्या जीवनातले काही प्रसंग यांचे भव्य देखावे मांडले होते. प्रत्येक मांडणी वैशिष्ट्यपूर्ण होती. बहुधा स्पर्धा असावी. मला वाटते येशूच्या गोठ्यातील जन्मामुळे रस्त्यात गवताच्या कलाकृती पाहायला मिळाल्या. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या काही ठिकाणी जुन्या कपड्यांनी भरलेले आणि गवतापासून बनविलेले ओल्ड मॅन टांगलेले होते. (बर्निंग ऑफ ओल्ड मॅन) स्थानिक लोक जुन्या वर्षाला निरोप देताना त्या ओल्ड मॅनला जाळतात नि नवीन वर्षाचे स्वागत करतात. लहान मुलांना भेटवस्तू देणारा एक सांताक्लॉजही भेटला.

सांतावरून ‘चिकन सूप फॉर द वर्क’ या पुस्तकातील वाचलेली गोष्ट शेअर करते. मी आठवीत शिकत असताना फक्त संध्याकाळी वडिलांना दुकानात मदत करायला जात असे. मी खेळण्याचा विभाग नीटनेटका करीत असताना, पाच-सहा वर्षांचा एक मुलगा अंगात जीर्ण, उसवलेला, ढगळ कोट घातलेला, केस विस्कटलेला, एकूणच पैशाची कुवत नसलेला तरी चौकसपणे खेळणी न्याहाळत होता. माझे वडील त्या मुलाजवळ जाऊन प्रेमाने त्याला म्हणाले, “मी तुझ्यासाठी काय करू शकतो?” मला माझ्या छोट्या भावासाठी नाताळ भेट खरेदी करायची आहे. वडिलांनी अतिशय आदराने त्याला सुचवलं, “सावकाशीने एक-एक खेळणी बघ व नंतर ठरव.” काही वेळानंतर खेळण्यातलं एक विमान हातात घेऊन म्हणाला, काका हे विमान केवढ्याला? तुझ्याकडे किती पैसे आहेत? त्यांनी आपल्या छोट्या पंजातील नाणी दाखवली. सगळी मिळून दीड रुपया असेल. इतकीच किंमत आहे त्या विमानाची, असे म्हणून ९० रुपयांचे ते विमान रंगीत कागदात बांधून त्याच्या हाती आनंदाने दिले.

ख्रिसमसच्याच दुसऱ्या दिवशी माणसांनी फुललेल्या, विद्युत प्रकाशाने लखलखणाऱ्या होंडा गावच्या जत्रेत गेलो आणि लहानपणाचा हरविलेला जत्रेतील आनंद लुटला. जत्रेजवळच प्रसादच्या संजू मित्राकडील पार्टीत सहभागी होऊन जेवणाचे पार्सल बरोबर घेतले. गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवर तळेखोल येथे पूजाच्या फार्महाऊसवर कॅम्प-फायर करून पोर्णिमेच्या स्वच्छ प्रकाशात जेवलो. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या गोव्यातील साखळी या छोट्या गावात, प्रसाद-पूजामुळे ख्रिसमस उत्सवाची ही एक झलक अनुभवली. साऱ्या आसमंतात व्यापलेला प्रभू येशू, सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करीत होता. हेच अनुभवले. नाइट लाइफ एन्जॉय करण्यासाठी सारे समुद्रकिनारे भरलेले असतात. वाॅशरूमसहित उभारलेल्या शाक(तंबू)मध्ये सर्व सोयी असून गरमागरम खाणे, ड्रिंक्सही मिळते.

मध्ये दोन दिवस बाहेर जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रसादच्या मूळ गावी केरी येथे आलो. घराजवळच्या समुद्रकिनारी थोडेसे नाइट लाइफ अनुभवण्यासाठी आलो. समुद्रकिनारी फिरून थोड्या वेळाने भरतीच्या लाटांचा आवाज ऐकत, समुद्राचा गार वारा झेलत, रात्रीच्या शांत नीरव वातावरणात, अथांग आकाशाकडे, समुद्राकडे पाहत, वाळूत आरामात खुर्चीत बसून, प्रसादाच्या योगेश मित्रांकडून गरम गरम चटपटीत खाण्याचा पहिलाच अनुभव. आजही ते सारे डोळ्यांसमोर लख्ख उभे आहे. पूर्ण प्रवासात तन्मयी, निधी आणि वेदांत याच्या कंपनीमुळे आणखीन मजा आली; ख्रिसमसचा आनंद घेत आम्ही अधिक तरुण झालो. घरी येऊन प्रसादच्या
आई-बाबाबरोबर फायर कॅम्प करून, फोटो काढून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
mbk1801@gmail.com
Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे