मुंबई: राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल, असे स्पष्ट मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. ओमायक्रॉनच्या धोक्याबाबतही सतर्क राहावे. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या धोक्यामुळेच सरकारने खबरदारी म्हणून काही निर्बंध लागू केले आहेत. त्याचे नागरिकांनी त्याचे पालन करावे, असे आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केले आहे.
नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करा!
टोपे पुढे म्हणाले की, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच ख्रिसमस, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात काही नवे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमागचे प्रमुख कारण म्हणजे जगात युरोप, अमेरिका आणि फ्रान्समध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती एका दिवसात दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे. गती आहे पण त्याबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. कारण मृत्यूदर अधिक नाही. असे असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करावे, अशी नम्र विनंती आहे.
…तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल!
ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती जर दुप्पट आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की, आपल्याकडे सध्या जो ६०० ते ७०० चा आकडा होता तो आता १४०० पर्यंत वाढत आहे. त्यात ओमायक्रॉनचे राज्यातील रुग्णही १०० च्या घरात गेले आहेत. संसर्गाची गती वाढत गेली आणि तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉनचीच असेल अशी शक्यता आहे. त्यामुळे ज्यादिवशी राज्याला ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल, त्यादिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. पण कोरोना संसर्गाची गती जर अधिक असेल, तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनांवर आणावी लागेल, असेही टोपे म्हणाले.
निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये!
टोपे म्हणाले की, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावे. दुपटीने रुग्ण वाढण्याचे प्रमाण असेच सुरू राहिले, तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावे, असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं आहे.
परीक्षेत घोटाळा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील!
आरोग्य भरतीतील परीक्षांबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत पोलीस तपास अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
खाजगी संस्थांना परीक्षेचे कंत्राट दिले जाणार नाही!
आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे. आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही. येथून पुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचे कंत्राट दिले जाणार नाही. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.