ठाणे : कोवीड-१९ च्या वाढत्या संसर्गजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले असून ठाणेकरांनी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. दरम्यान महानगरपालिका क्षेत्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिका व अन्य युरोपीय देशात मागील काही दिवसात ओमिक्रॉन कोरोना विषाणूचा प्रसार जलद गतीने होत असल्याचे निर्देशनास येत आहे.महाराष्ट्र राज्यात यापूर्वीच ओमिक्रोन कोरोना विषाणूच्या ८८ रुग्णाची नोंद झालेली आहे. तसेच मागील आठवड्यात कोव्हिड-१९ च्या एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद प्रत्येक दिवशी राज्यात होत असल्याचे निर्देशनास येत आहे.
त्यादृष्टीने प्रतीबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करुन नाताळ ( CHRISTMAS ), लग्न समारंभ अन्य सण समारंभ व नव वर्षाचे स्वागत समारंभ याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात देखील निर्बंध घालण्यात येत आहेत.
यामध्ये नाताळ सण साजरा करताना गृह विभागाने दिलेल्या नियमांचे तंतोतंन पालन करणे, विवाह सोहळ्यांना कोणत्याही प्रकाराच्या बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळी १०० पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही. तसेच , खुल्या मैदानात २५० लोक किंवा क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीची अट राहणार आहे. इतर सामाजिक , राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यात बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळी १०० पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही. तसेच , खुल्या मैदानात २५० लोक किंवा क्षमतेच्या २५ टक्के लोकांना उपस्थित राहता येणार आहे. या व्यतिरिक्त इतर कार्यक्रमांच्या बाबतीत बंदीस्त सभागृहात क्षमतेच्या ५० % तर खुल्या मैदानात २५ टक्केच परवानगी राहणार आहे.
क्रिडा स्पर्धासाठी क्षमतेच्या २५ टक्केच प्रेक्षकांना उपस्थित राहणेची परवानगी राहणार आहे. इतर कोणत्याही संमेलनासाठी / मेळाव्यासाठी २५० लोक किंवा क्षमतेच्या २५ टक्के लोकांना उपस्थित राहता येणार आहे. उपहार गृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामशाळा यामध्ये सध्या लागू असलेली आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची अट यापूढेही कायम रहाणार आहे. उपहार गृह मालकांना एकूण आसन क्षमतेविषयी माहिती ठळकपणे प्रदर्शीत करणे बंधकारक असणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.