Saturday, March 15, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यख्रिस्तजन्माचा संदेश: अपराधीपणाची भावना कायमची संपविणे शक्य आहे!

ख्रिस्तजन्माचा संदेश: अपराधीपणाची भावना कायमची संपविणे शक्य आहे!

श्रीनिवास बेलसरे

अलीकडे जगभर प्रसिद्ध झालेल्या ‘मेनी लाइव्हज्, मेनी मास्टर्स’ (Many Lives, Many Masters) या ‘बेस्टसेलर’ पुस्तकाचे लेखक आणि अमेरिकेतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ब्रायन वाईस यांच्या मते, माणसाला अपराधीपणाच्या भावनेची बोच केवळ या जन्मातच सहन करावी लागते, असे नाही तर माणसे ही बोच अनेक जन्म भोगत असतात. त्यांचे अंतःकरण त्याच त्या भावसंचीतामधून निर्माण झालेल्या चक्रात सापडून ते स्वतःच्या मनाचा छळ करून घेतात. (डॉ. वाईस हे धर्माने ज्यू आहेत आणि त्यांनी अभ्यासाअंती भारतीय अध्यात्मातील पुनर्जन्माचा विचार स्वीकारला आहे.)

धर्मातील पुरोहित वर्गाने माणसाच्या या साध्या सरळ भावनेचा उपयोग आपला स्वार्थ साधण्यासाठी केला तसाच तो येशू ख्रिस्त ज्या ज्यू धर्मात जन्माला आला त्याचे शास्त्री-पंडितही करत होते. भाविकांना तुमच्या पापाबद्दल देवापुढे प्रायश्चित्त द्यावे लागेल, असे सांगून तेही समाजाला लुटत होते. माणसाला अपराधीपणाच्या भावनेने घेरून टाकले की, त्याच्यावर राज्य करता येते, त्याला अगदी गुलामासारखे वापरून घेता येते, हे सर्वच धर्माच्या पंडितांना चांगले कळते.

येशूच्या जन्मापूर्वी प्रत्येक गोष्टीकरिता मंदिरात जाऊन पक्षी, बकरा, रेडा, बैल असे काही तरी देवाला बळी द्यायची प्रथा होती. शिवाय काही नैसर्गिक आपत्ती आली तरी ती आपल्याच चुकीमुळे आली असावी आणि आता आपल्यावर देवाचा कोप होईल या भीतीने माणूस घाबरलेला असे. येशूचे माणसाच्या मनात रुजलेली ही अपराधीपणाची भावना आश्वासकपणे आणि हळुवारपणे दूर केली! त्याने त्याच्या अनुयायांना आश्वासन दिले की, परमेश्वर कृपाळू आहे, क्षमाशील आहे. मनापासून पश्चाताप केल्यास तो माणसाच्या कोणत्याही पापांची क्षमा करतो.’ (मार्ककृत शुभवर्तमान अध्याय ३ : ओवी २८) पापाबद्दल ही प्रभूची मांडणी क्रांतिकारक होती. शास्त्री-पंडितांना समाजाचे शोषण करण्याची मुभा देणाऱ्या जुन्या रूढी-परंपराना उभा छेद देणारी होती! त्यामुळे ते त्याच्यावर नेहमी संतापलेले असत. त्यांनी येशूला ठार करण्याचाही अनेकदा प्रयत्न केला. ते त्याला ‘पापी लोकांचा मित्र’ म्हणून हिणवत असत. यावर त्याचे म्हणणे होते, ‘मी पुण्यवानांसाठी नाही, तर पापी लोकांसाठीच या जगात आलो आहे. कारण १०० सच्छील लोकांपेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पाप्यासाठी स्वर्गात जास्त आनंद साजरा केला जातो.’
येशूचे दुसरे मोठे योगदान म्हणजे त्याने ईश्वराची नवी व्याख्या केली. येशूच्या जन्मापूर्वीच्या बायबलच्या भागात आपल्याला आपण जे परमेश्वराचे वर्णन वाचतो त्यावरून तो विश्वनिर्माता, माणसांचा न्याय करणारा न्यायाधीश, जगाच्या सर्व हालचालींचा नियंत्रक, कित्येकदा तर सूड घेणारा निष्ठुर योद्धा असा भासतो. येशूने देवाची ही भयकारी प्रतिमा बदलून त्याचे प्रेममय आणि वत्सल रूप लोकांसमोर मांडले! म्हणून तो देवाला ‘आकाशातल्या बापा’ असे संबोधतो.

आपण देवाकडे प्रेमाने आणि विश्वासाने मागितले, तर देव आपल्या सर्व मागण्या पूर्ण करतो हे त्याचे वचन कुणाला एखाद्या सुभाषितासारखे सुंदर पण अवास्तव वाटू शकते. मात्र अलीकडेच एका अमेरिकी लेखिकेच्या बेस्टसेलर पुस्तकामुळे प्रभूच्या त्या वचनाची सत्यता सिद्ध झाली आहे.

होंडा बर्न (Rhonda Byrne) या लेखिकेने ‘Secret’ (सिक्रेट) चित्रपट काढताच आणि त्यानंतर त्याचे नावाचे पुस्तक प्रकाशित केल्यावर सर्व जगाला ते अनुभवायला मिळाले! हा चित्रपट म्हणजे येशूच्या ‘मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल’ या दैवी आश्वासनाचा आजच्या लौकिक जगातील पुरावा होता. कारण या सिनेमात कमालीच्या यशस्वी झालेल्या ५५ मोठ-मोठ्या उद्योजक, चित्रपट-तारे, व्यावसायिक इत्यादींच्या मुलाखती होत्या आणि त्यांनी आपण ‘लॉ ऑफ अॅट्रॅक्शन’चे तत्त्व पाळल्याचे सांगितले होते. जे मुळात येशूच्या ‘मागा म्हणजे तुम्हाल दिले जाईल’ यावरील वचनाचे आधुनिक रूप आहे.

मात्र येशूने दिलेले हे आश्वासन पूर्ण होण्याच्या काही अटी आहेत. येशू म्हणतो, ‘तू मंदिरात जायला निघाला असशील आणि तुझ्या लक्षात आले की, आपले आपल्या भावाबरोबरचे भांडण तसेच आहे. तर वेदीवरून खाली उतर, आधी जाऊन आपल्या दुखावलेल्या भावाबरोबर समेट कर, मगच देवापुढे जा. नाही तर देव तुझी प्रार्थना ऐकणार नाही.’ प्रथम ‘दुसऱ्याला क्षमा करा’ असा प्रभूचा आग्रह आहे. प्रभू म्हणतो जोपर्यंत तुम्ही ‘ज्यांनी तुमच्याविरुद्ध अपराध केले आहेत, त्यांना माफ करीत नाही तोपर्यंत ईश्वरही तुम्हाला माफ करणार नाही.’

आज अमेरिकेतील प्रसिद्ध विचारवंत लुईस एल. हे यांचे ‘You can heal your life’ (यू कॅन हिल युअर लाईफ) हे पुस्तक गाजते आहे. त्याच्या जगभर ४० दशलक्ष प्रती विकल्या गेल्यात. लुईस हे म्हणतात, कुणीच कुणाला दोष न देता विनाअट क्षमा करणे, हा आपल्यापुढचा एकमेव पर्याय आहे. अन्यथा आपण अनेकदा सुडाची भावना, द्वेष मनात आयुष्यभर जपून ठेवून आपलेच आध्यात्मिक नुकसान करून घेत असतो. त्यांनी केलेल्या अनेक प्रयोगात हे सिद्ध झाले आहे की, जेव्हा आपण मनात साठवून ठेवलेला राग, रोष, द्वेष विनाशर्त सोडून देतो तेव्हा आपल्याकडे येणारे वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाचे मार्ग खुले होतात आणि जीवन आनंदमय होऊन जाते. (बायबल. मार्ककृत शुभवर्तमान, अध्याय ११ ओवी २२ ते २५)

पारंपरिक ख्रिस्ती श्रद्धेप्रमाणे आज असलेला नाताळ हा सण म्हणजे ख्रिस्तजन्माचा उत्सव आहे. पण वास्तवात प्रत्येक २५ डिसेंबर हा आपल्याला आलेले देवाचे एक स्मरणपत्रच आहे की दु:खाची, अपराधीपणाच्या भावनेची काही आवश्यकता नाही. तो परमपिता परमेश्वर त्याच्या लेकरांवर त्यांच्या गुणदोषांसह प्रेमच करीत असतो. गरज आहे ती चुकांबद्दल, पापाबद्दल मनापासून फक्त पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागण्याची! स्वत:ही इतरांना मनापासून माफ करून येशूच्या शिकवणुकीप्रमाणे शत्रूवरही प्रेम करण्याइतके मन मोठे करण्याची! नाताळ सणाचा आणि येशूच्या आगमनाचा खरा संदेश हाच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -