कुणाल म्हात्रे
कल्याण : कल्याण-डोंबिवली अ प्रभाग क्षेत्रात राहत असणाऱ्या मुस्लिम समाजासाठी मृतांना दफन करण्यासाठी पालिकेची अधिकृत दफनभूमी नसल्याचे उघड झाले आहे.
महापालिका क्षेत्रात भूखंडावर आरक्षण टाकून प्रशासनाने प्रत्यक्षात कागदोपत्री ताबा न घेता भूमाफियांनी मोकळ्या आरक्षित जागेवर टॉवर्स उभे करण्याचे धाडस दाखविले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागात ‘१० वॉर्ड’ येत असून किमान २० हजारांच्या आसपास मुस्लिम समाज वास्तव करीत आहे. वडवली, अटाळी, मोहने शहरातील विविध विभाग तसेच बल्याणी, आंबिवली आदी भागात विखुरलेला मुस्लिम समाज राहत असून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दफनभूमी नसल्याने मृतदेहाला ट्रक किंवा टेम्पोमध्ये दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये घेऊन जावे लागते. नागरिकांच्या दृष्टिकोनातून ही खर्चिक बाब असून अनेकदा ट्राफिकमध्ये दफनभूमीत पोहोचण्यासाठी दमछाक होते.
मोहने विभागातील जामा मस्जिदच्या ट्रस्टींनी अनेकदा पालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार, खासदार, आमदार तसेच राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महसूल मंत्री आदींकडे निवेदन देऊनही दफनभूमीबाबत पोकळ आश्वासने देण्यात आली आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला सर्वच प्रकारचा कर भरूनही पालिका प्रशासनाने दफनभूमीबाबत उदासीनतेची भूमिका स्वीकारली असल्याचा आरोप जामा मस्जिदचे आयुब खान यांनी केला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे नगररचनाकार रघुवीर शेळके यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी दफनभूमीसाठी जागा आरक्षित केले नसल्याचे सांगितले आहे.