बाळासाहेब भालेराव
मुरबाड : माळशेज घाटातून सुसाट वेगात जाणाऱ्या वाहनांवर आता महामार्ग पोलिसांच्या स्पीडगनची कडक नजर असून अनियंत्रित वाहन मालकांच्या मोबाईलवर तत्काळ दंडाची पावती पाठवली जात आहे.
माळशेज घाटात अपघातांचे सत्र नेहमीच सुरू असते. घाटातील अपघात प्रवण क्षेत्रात वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. अपघातस्थळी देवदूतासारखे माळशेज महामार्ग पोलीस कार्यतत्पर असतात. माळशेज महामार्ग पोलीस नेहमीच रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करून वाहन चालकांना रस्ते नियम व सुरक्षितता या विषयी मार्गदर्शन करून जनजागृती करीत आहेत.
माळशेज घाटातील रस्त्यावर वेग मर्यादा ३० च्या वेगात वाहने चालवणे अपेक्षित आहे. मात्र, काही वाहनचालक या नियमाला पायदळी तुडवीत अनियंत्रित वेगात भरधाव वाहने चालवीत असतात, मात्र आता माळशेज महामार्ग पोलिसांच्या वेग मोजण्याच्या स्पीडगन वाहनामुळे सुसाट वेगाला ब्रेक आला आहे.
वाहतूक व रस्ते नियमांचे काटेकोर पालन वाहनचालकांनी करावे, सुरक्षितता बाळगून प्रवास करावा, असे आवाहन स्पीडगनच्या सहाय्याने वेग मोजण्याचे कर्तव्य बजावणारे माळशेज महामार्ग पोलीस कर्मचारी प्रवीण सर्जेराव गायकवाड यांनी माळशेज घाटात कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असताना दैनिक प्रहारशी बोलताना सांगितले.