
नवी दिल्ली : एका अत्तर व्यावसायिकाच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता त्यांच्या हाती १५० कोटींचे मोठे घबाड लागले आहे. कानपूरमध्ये व्यवसाय करणाऱ्या पियूष जैन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल १५० कोटींची रोख रक्कम लागली आहे. मागील दोन दिवसांपासून या रकमेची मोजणी सुरु आहे.
https://twitter.com/BJP4UP/status/1474285236426997762
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे कि, यामध्ये नोटांचे ढीग दिसत आहेत. एका फोटोत कपाट नोटांनी भरल्याचे दिसत आहे. हे पैसे प्लास्टिक पिशवीत ठेवत त्यावर चिकटपट्टी लावून ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अधिकारी खाली बसून पैसे मोजताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर नोटांचा ढीग लागला आहे.
कारवाई करण्यात आलेले पियूष जैन हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अखिलेश यादव यांनीच त्यांच्या अत्तराचे लाँचिंग केले होते. यावरुन भाजपाने अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. हाच समाजवादी पक्षाचा खरा रंग आहे असे ट्विट उत्तर प्रदेश भाजपाने केले आहे. समाजवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका त्यांनी केली आहे.
https://twitter.com/BJP4UP/status/1474246406537809924
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही धाड टाकण्यात आली असून कारवाई अद्यापही सुरु आहे. कानपूर, उत्तर प्रदेश, मुंबई आणि गुजरातमध्ये ही कारवाई सुरु आहे. करचोरी केल्याप्रकरणी जीएसटीकडून ही कारवाई करण्यात आली. यानंतर आयकर विभागही कारवाईत सहभागी झाले.
खोटी बिले बनवून हे सर्व पैसे गोळा करण्यात आले होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बनावट कंपन्यांच्या नावे ही बिले तयार करण्यात आली होती. एक बिल ५० हजारांचे असून अशी २०० हून अधिक बिले जीएसटी पेमेंटविना तयार करण्यात आली होती. चार ट्रकमध्ये ही बिले सापडली असून ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत.