Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

नोंदणी केली, पण डोस न घेताच तरूण पळाला; व्हिडिओ व्हायरल

नोंदणी केली, पण डोस न घेताच तरूण पळाला; व्हिडिओ व्हायरल

डोंबिवली : डोंबिवलीत एका २९ वर्षीय युवकाने कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccine) नोंदणी केली आणि लस न घेताच तो पळून गेल्याचा अजब प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. तर आरोग्य विभाग या तरुणाला शोधण्याच्या कामात गुंतले आहेत.

एकीकडे ओमायक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा नियम कठोर करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घ्यावे लागत आहेत. यामुळे लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे, तर दुसरीकडे मात्र अनेक जण यातही पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत असल्याने संभाव्य तिसरी लाट रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

डोंबिवली पूर्वेकडे नेहरू मैदानात पालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या ऋषीकेश मोरे, या २९ वर्षीय तरूणाने दुसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशन केले. मात्र त्यानंतर तो लस न घेताच निघून जाऊ लागला. सेंटरवरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ऋषिकेशला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने स्वच्छतागृहात जाऊन येण्याचा बहाणा केला. त्यावर कर्मचाऱ्यांनी त्याला लस टोचून घेतल्यानंतर जाण्यास सांगितले. मात्र यानंतर तो चक्क पळून जाऊ लागला. यामुळे सेंटरवर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ढकलून देत तो लस न घेताच पळून गेला.

या घडल्या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. या तरुणाला शोधून काढत त्याचे लसीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. मात्र दुसरा डोस असतानाही त्याने लस घेण्यास टाळाटाळ केल्याने पहिला डोस देखील त्याने घेतला आहे की, केवळ कागदोपत्री नोंद करून प्रमाणपत्र मिळवले आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, कल्याण - डोंबिवली महापालिकेकडून लसीकरण सुरू आहे. केंद्रावर तरूण लस घेण्यास आला. त्याने नोंदणी केल्यानंतर तो पळून जाऊ लागला. कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो तरूण लसीचा डोस न घेता पळून गेला. वरिष्ठांना कळवले आहे. त्या तरूणाला शोधून डोस देण्यात येईल. वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा साळवी यांनी सांगितले.

Comments
Add Comment